प्रवाशांकडून लालपरीचे लाड बंद; एसटी महामंडळाला चपराक, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने जबर आर्थिक फटका
By नरेश डोंगरे | Updated: October 5, 2025 21:40 IST2025-10-05T21:40:31+5:302025-10-05T21:40:50+5:30
St Bus News: प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून प्रवास भाड्यात वाढ करणाऱ्या एसटी महामंडळाला राज्यातील प्रवाशांनी सणसणीत चपराक लगावली. त्यांनी लालपरीचे लाड बंद करून प्रवासासाठी दुसरे पर्याय शोधल्यामुळे एसटी महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला.

प्रवाशांकडून लालपरीचे लाड बंद; एसटी महामंडळाला चपराक, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने जबर आर्थिक फटका
- नरेश डोंगरे
नागपूर - प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून प्रवास भाड्यात वाढ करणाऱ्या एसटी महामंडळाला राज्यातील प्रवाशांनी सणसणीत चपराक लगावली. त्यांनी लालपरीचे लाड बंद करून प्रवासासाठी दुसरे पर्याय शोधल्यामुळे एसटी महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. त्यामुळे भानावर आलेल्या एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर 'आवडेल' अशी घसघशीत भाडेकपात केली आहे.
गेल्या दोन वर्षांत एसटी महामंडळाच्या लालपरीचे प्रवाशांनी भरभरून लाड पुरविणे सुरू केले आहे. परिणामी एसटीची प्रत्येक गाडी प्रवाशांनी खच्चून भरून धावताना दिसते आहे. महामंडळाच्या उत्पन्नात त्यामुळे मोठी वाढ झाल्यामुळे की काय, एसटी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला. २४ जानेवारी २०२५ पासून ही भाडेवाढ झाली. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२५ पासून 'आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पास'मध्येही मोठी रक्कम वाढवली. एसटीच्या अनेक मार्गावर खटारा बसेस धावतात. त्यांचा खडखडाट सहन करणाऱ्या प्रवाशांना भाववाढीच्या माध्यमातून एसटीने रंग बदल्याचे अजिबात आवडले नाही. त्यांनी लालपरीचे लाड कमी करून तिच्याकडे पाठ फिरविणे सुरू केले. परिणामी एसटीच्या प्रवाशी संख्येत सहा महिन्यांपासून सारखी घट होऊ लागली.
त्याचा परिणाम एसटीच्या तिजोरीवर झाला. बसेस प्रमाणे एसटीच्या तिजोरीतही खडखडाट होत असल्याचे पाहून महामंडळाचे पदाधिकारी भानावर आले आणि त्यांनी अखेर प्रवाशांनाचुचकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता एसटीच्या आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासचे दर एकूण रकमेच्या २५ टक्के पेक्षा कमी करण्यात आले आहे. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हे दर लागू केले जाणार आहे. शनिवारी तशा प्रकारची सूचना एका परिपत्रकातून महामंडळाने आपल्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
सुधारित प्रवास दर
आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी चार आणि सात दिवसांचा प्रवासी पास मिळतो. प्राैढ प्रवाशांना त्यासाठी १८१४ रुपये मोजावे लागतात. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मात्र या पाससाठी १३६३ रुपये द्यावे लागतील. अर्थात या पासचे दर ४५० रुपयांनी कमी होतील. तर, पालकांसह प्रवास करणाऱ्या ५ वर्षांपेक्षा जास्त आणि १२ वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांना ही पास सध्या ९१० रुपयांत मिळते. नव्या दरानुसार ती ६८५ रुपयांत मिळेल. अर्थात मुलांच्या पासची किंमत २२५ रुपयांनी कमी होईल. त्याच प्रमाणे सात दिवसांचा पास जो सध्या ३१७१ रुपयांत मिळतो. त्याची किंमत ७८९ रुपयांनी कमी होणार असून तो पास २३८२ रुपयांना मिळणार आहे. मुलांसाठी या पासची किंमत १५८८ रुपये आहे. ती ३९४ रुपयांनी कमी होऊन ११९४ रुपयांवर स्थिरावणार आहे.