वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; नागपूर - इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसला आणखी आठ कोच
By नरेश डोंगरे | Updated: November 22, 2025 19:33 IST2025-11-22T19:31:48+5:302025-11-22T19:33:37+5:30
Nagpur : प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हुरूपलेल्या मध्य रेल्वे प्रशासानाने नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Passengers respond enthusiastically to Vande Bharat Express; Eight more coaches added to Nagpur-Indore Vande Bharat Express
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हुरूपलेल्या मध्य रेल्वे प्रशासानाने नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता या गाडीला आणखी आठ कोच जोडले जाणार आहे.
नागपूर येथून सर्वप्रथम नागपूर-बिलासपूर-नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वंदे भारतला नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखविला होता. दुसरी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर-इंदोर-नागपूर सुरू झाली. तिसरी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर-सिकंदराबाद-नागपूर आणि चवथी नागपूर-पुणे-नागपूर सुरू करण्यात आली. यातील नागपूर-बिलासपूर आणि नागपूर सिकंराबाद वंदे भारतला प्रवासीच मिळत नसल्याने त्या गाड्यांचे कोच कमी करण्याची स्थिती निर्माण झाली होती. नागपूर पुणे एक्सप्रेसला बऱ्यापैकी प्रवासी मिळतात. मात्र, गाडी क्रमांक २०९१२/२०९११ नागपूर-इंदोर-नागपूर एक्सप्रेसला भरभरून प्रवासी मिळत असल्याने या गाडीमध्ये अनेकदा आसने उपलब्ध नसतात. सध्या या गाडीला आठ कोच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागते.
ही स्थिती लक्षात आल्याने या गाडीला आणखी कोच जोडून आसन क्षमता वाढविण्यावर अनेक दिवसांपासून विचार सुरू होता. तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे गेला होता. त्याला अखेर मंजूरी मिळाली. त्यानुसार, आता या गाडीला आणखी आठ कोच जोडून ही गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्यांना अधिक सोयीचे होणार आहे.
सोमवारपासून धावणार १६ कोच
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०९१२/२०९११ नागपूर-इंदोर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आता सोमवारी, २४ नोव्हेंबरपासून १६ कोचसह धावणार आहे. यात दोन कोच एसी एक्झिकेटीव्ह क्लास राहणार असून, १४ एसी चेअर कार्स राहणार आहेत.