संतापजनक ! दोन लाखांच्या कर्जासाठी विधवा शेतकरी महिलेला सहा महिने बँकेने झुलवले; शेवटी व्याजाने काढावे लागले कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:40 IST2026-01-07T17:39:15+5:302026-01-07T17:40:43+5:30
बाजारगावच्या शाखेतील संतापजनक प्रकार : व्याजाने काढावे लागले तीन लाखांचे खासगी कर्ज

Outrageous! Bank hounds widowed farmer for six months for Rs 2 lakh loan; finally had to pay back the loan with interest
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : गरमसूर येथील विधवा शेतकरी महिलेने जून २०२५ रोजी बाजारगावातील बँक ऑफ इंडिया शाखेत कर्जासाठी अर्ज केला. बँकेच्या व्यवस्थापकाने कर्ज देण्यापूर्वीच दि. ३१ जुलै २०२५ रोजी तिच्या सातबारावर कर्जाचा बोझा चढविला. पण, कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे मागितली. आठ-पंधरा दिवसांनी बँकेत गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कागदपत्रांसाठी परत पाठविले. त्यामुळे महिलेला सुमारे तीन लाखांचे खासगी कर्ज व्याजाने घेऊन शेतात कापूस, सोयाबीन पिकं घ्यावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.
गरमासूर येथील सुनंदा नत्थू कंगाली यांच्याकडे दहा एकर जमीन आहे. पती नत्थू यांच्या निधनानंतर त्यांची बहीण, पत्नी, दोन मुले व मुलगी यांची नावे या जमिनीवर चढली. त्यामुळे सहा जणांची संमती या कर्जासाठी लागत होती. मुलीचे लग्न झाल्याने ती बाहेरगावी राहते. एक मुलगा नागपुरात कंपनीत काम करतो. खरिपाच्या कर्जासाठी जून २०२५ मध्ये सुनंदा यांनी बँक ऑफ इंडियाच्या बाजारगाव येथील शाखेत अर्ज केला. परंतु, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना एका-एका कागदासाठी झुलवले. वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे मागविण्यात आली.
दुसरीकडे जाण्याचा सल्ला
कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सुनंदा यांची दमछाक झाली. पण, आणखी कागदपत्र कमी असल्याचे सांगून कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ करण्यात आली. दुसऱ्या बँकेतून कर्ज घ्या, आमच्याकडून मिळणार नाही, असा सल्लाही देण्यात आला. मंगळवारी (दि. ६) उशिरा संबंधित महिलेच्या खात्यात दोन लाख रुपयांचे पीककर्ज शेवटी जमा करण्यात आले.
"खरीप पीककर्जासाठी अर्ज करून सहा महिने झाले तरी कर्ज मिळाले नव्हते. परंतु, दि. ३१ जुलै रोजी कर्ज न मिळता बोजा चढविल्याने मी अडचणीत आले होते. शिवाय व्याजाची रक्कम घेऊन शेतीत पीक काढावे लागले. व्याजाच्या रकमेत बरेच पैसे खर्च होत आहेत."
- सुनंदा नत्थू कंगाले, रा. गरमसूर
"संबंधित बँक व्यवस्थापकाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली. कागदपत्रांसाठी बँकेच्या खेटा माराव्या लागल्या. महिलेचे झालेले नुकसान संबंधित बँक व्यवस्थापकाकडून वसूल केले पाहिजे. तीन-चार शेतकऱ्यांना या बैंक व्यवस्थापकाने त्रास दिला."
- विनोद राठोड, गरमसूर