संतापजनक! नागपुरात सहावीतील विद्यार्थ्याला व्हॅन चालकाने लावले ई-सिगारेटचे व्यसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 00:04 IST2026-01-23T00:01:45+5:302026-01-23T00:04:40+5:30
पोलिसाच्या मुलाची प्रकृती बिघडली : शाळेच्या स्वच्छतागृहातदेखील ओढायचा ई-सिगारेट

संतापजनक! नागपुरात सहावीतील विद्यार्थ्याला व्हॅन चालकाने लावले ई-सिगारेटचे व्यसन
- योगेश पांडे,नागपूर
मागील काही काळापासून शहरात सिगारेट्स व ई-सिगारेट्सच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शहरातील पालकांना हादरविणारी घटना एका नामांकित शाळेत घडली आहे. कोचिंग क्लासच्या एका व्हॅनचालकाने चक्क नामांकित शाळेतील सहावीतील विद्यार्थ्याला ई-सिगारेटच्या व्यसनाच्या नादी लावले. वडील पोलिस विभागात असलेल्या संबंधित विद्यार्थ्याने घरून पैसेदेखील चोरले. सिगारेटच्या व्यसनामुळे त्याची प्रकृतीदेखील बिघडली. शाळेच्या स्वच्छतागृहात ई-सिगारेट ओढताना पकडला गेल्यावर या प्रकाराचा भंडाफोड झाला. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
वरुण सोनी (२४, पोलिस लाइन टाकळी) असे आरोपी व्हॅनचालकाचे नाव आहे. तो एका कोचिंग क्लास ॲकेडमीसाठी व्हॅन चालविण्याचे काम करतो. पोलिस विभागात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या १२ वर्षीय मुलाशी त्याची ओळख झाली होती. वरुणला ई-सिगारेटचे व्यसन आहे. त्याने सहावीतील मुलाला एकटे गाठून काही काळाअगोदर त्याला ई-सिगारेट एकदा ओढून पाहा, असे म्हटले.
लहान मुलाला काहीही न समजल्याने त्याने ती सिगारेट ओढली. फ्लेव्हर्ड वॅप असल्याने अजाणत्या विद्यार्थ्याला त्यात नवलाई वाटली. त्याने वरुणच्या सांगण्यावरून अनेकदा सिगारेट ओढली. जर तुलादेखील अशीच सिगारेट हवी असेल तर पाचशे रुपये लागतील, असे वरुणने विद्यार्थ्याला म्हटले.
विद्यार्थ्याने आईच्या पर्समधून पाचशे रुपये चुपचाप काढले व ते वरुणला दिले. वरुणने त्याला फ्लेव्हर्ड सिगारेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्याला चक्क त्याचे व्यसनच लागले. मात्र, त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुलाला चक्कर आली व त्याचे हातपाय कडक झाले. वरुणने तातडीने त्याच्या आईला फोन करून त्याला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, इतके झाल्यावरही त्याने सिगारेटबाबत कुठलीही माहिती घरच्यांना दिली नाही.
असा झाला भंडाफोड
काही दिवसांअगोदर विद्यार्थ्याच्या शाळेतून फोन आला व त्याच्या पालकांना बोलावण्यात आले. विद्यार्थी शाळेच्या स्वच्छतागृहात ई-सिगारेट ओढताना सुरक्षारक्षकाला आढळला होता व त्यानंतर हा प्रकार शिक्षक व मुख्याध्यापकांना समजला. विद्यार्थ्याच्या पालकांना जेव्हा झाला प्रकार सांगण्यात आला ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलाला दरडावून विचारणा केली असता त्याने सर्व प्रकार त्यांना सांगितला.
आरोपी आणखी विद्यार्थ्यांना विकणार होता ई-सिगारेट
आरोपी वरुणने आणखी काही विद्यार्थ्यांनादेखील ई-सिगारेटची सवय लावण्याचा प्रयत्न केला होता. एका विद्यार्थ्याला सिगारेटसाठी पैशांची मागणी केल्याचे पीडित विद्यार्थ्याने सांगितले. वरुणला शाळेत बोलावण्यात आले असता त्याने अखेर सर्व प्रकार कबूल केला.
विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.