विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे
By योगेश पांडे | Updated: October 6, 2025 19:16 IST2025-10-06T19:16:03+5:302025-10-06T19:16:48+5:30
महसूलमंत्री बावनकुळे : ओबीसी–मराठा संघर्ष होऊ नये ही सर्वांची जबाबदारी

Opposition should prioritize farmers' interests instead of politics
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले आहे. बळीराजा संकटात असताना सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहेच. मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता विरोधक व सर्वच राजकीय पक्षांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
समाजातील मनभेद बाजूला ठेवून राज्याला संकटातून बाहेर काढण्यावर भर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. कोणीही समाजात भडकावू वक्तव्य करू नये, चिथावणी देऊ नये. दोन्ही समाजात भाऊबंदकी टिकली पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.अशा काळात दोन समाजांना समोरासमोर आणणे योग्य नाही. सध्या शेतकऱ्यांना मदत करणे हीच खरी वेळेची गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
आघाडी सरकारने आकसापोटी दाखल केले होते गुन्हे
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द झाले होते. त्या विरोधात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले. मात्र त्या वेळी आघाडी सरकारने आमच्याविरुद्ध आकसापोटी गुन्हे दाखल केले. न्यायालयाने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले असून हा न्यायाचा विजय आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील आरोपांचे खंडन
पुण्यातील घटनेनंतर काँग्रेसकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. चंद्रकांत पाटील हे संघाच्या संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे आयुष्य लोकांसाठी आदर्श आहे. अशा व्यक्तीवर गुन्हेगाराला मदत केल्याचा आरोप करणे म्हणजे संस्कारहीन वर्तन आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांकडे त्यांच्या संस्कारांचा एक टक्का सुद्धा नाही, असे बावनकुळे म्हणाले.
अनिल देशमुखांचे आरोप ‘राजकीय स्टंटबाजी’
माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दहा किलोचा गोटा मारला गेल्याचा दावा केला होता व तो हास्यास्पद आहे. मी तो अहवाल पाहिलेला नाही, पण हे सर्व राजकारण आणि स्टंटबाजीचा भाग आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होतो, असे बावनकुळे म्हणाले.
२०२९ पर्यंत वीजदर ५० टक्के कमी होणार
सध्याची वीजदर वाढ ही तात्पुरती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमईआरसीकडे असा प्रस्ताव सादर केला आहे की, २०२९ पर्यंत विजेचे दर ५० टक्क्यांनी कमी होतील. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होणार आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.