उद्या आकाशात दिसणार ‘ऑपोजिशन ऑफ ज्युपिटर’ ! कधी पाहता येणार गुरु ग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ येणारा क्षण ?
By निशांत वानखेडे | Updated: January 7, 2026 20:32 IST2026-01-07T20:31:25+5:302026-01-07T20:32:23+5:30
Nagpur : सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला गुरु शुक्रवार, ९ जानेवारी रोजी आकाशात एका महत्त्वाच्या खगोलीय अवस्थेत दिसणार आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या तुलनेत गुरु ग्रह अगदी विरुद्ध दिशेला येत असल्याने ही घटना खगोलशास्त्रात ‘ऑपोजिशन ऑफ ज्युपिटर’ म्हणून ओळखली जाते.

'Opposition of Jupiter' will be visible in the sky tomorrow! When will we be able to see the moment when Jupiter comes closest to Earth?
नागपूर : सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला गुरु शुक्रवार, ९ जानेवारी रोजी आकाशात एका महत्त्वाच्या खगोलीय अवस्थेत दिसणार आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या तुलनेत गुरु ग्रह अगदी विरुद्ध दिशेला येत असल्याने ही घटना खगोलशास्त्रात ‘ऑपोजिशन ऑफ ज्युपिटर’ म्हणून ओळखली जाते. या अवस्थेत गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अधिक जवळ येतो आणि त्यामुळे तो नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी, मोठा व स्पष्ट दिसतो. सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिजावर साध्या डोळ्यांनीही गुरु ग्रहाचे निरीक्षण करता येणार असल्याने खगोलप्रेमींसाठी ही एक दुर्मीळ संधी ठरणार आहे.
खगोल व ज्योतिष अभ्यासक डॉ. अनिल वैद्य यांच्या माहितीनुसार, गुरु ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारण १२ वर्षांचा कालावधी घेतो. पृथ्वी त्याच्या तुलनेत अधिक वेगाने सूर्याभोवती भ्रमण करत असल्याने दर सुमारे १३ महिन्यांनी पृथ्वी–गुरु युती किंवा ऑपोजिशनची स्थिती निर्माण होते. याच खगोलीय प्रक्रियेचा परिणाम म्हणून ९ जानेवारी रोजी गुरु ग्रह पृथ्वीच्या दृष्टीने सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूस स्थित राहणार आहे.
या दिवशी गुरु ग्रह सूर्यापासून सुमारे ७८ हजार कोटी किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असला, तरी पृथ्वीच्या तुलनेत त्याचे अंतर तुलनेने कमी असल्याने तो आकाशात ठळकपणे उठून दिसेल. सायंकाळी सूर्य पश्चिम क्षितिजावर मावळल्यानंतर लगेचच पूर्व दिशेला गुरु ग्रह तेजस्वी पिवळसर प्रकाशासह उगवताना दिसेल. विशेष म्हणजे, या निरीक्षणासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासणार नाही.
खगोल अभ्यासकांच्या दृष्टीने ‘ऑपोजिशन’ अवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या काळात ग्रहाचा अभ्यास, छायाचित्रण तसेच त्याच्या हालचालींचे निरीक्षण अधिक अचूकपणे करता येते. स्वच्छ आकाश असल्यास नागपूर शहरासह परिसरातील ग्रामीण भागातही हे दृश्य सहज अनुभवता येणार आहे. डॉ. अनिल वैद्य यांनी शाळा, महाविद्यालये, विज्ञान मंडळे आणि खगोलप्रेमी संस्थांनी सामूहिक निरीक्षण कार्यक्रम राबवावेत, असे आवाहनही केले आहे. अशीच खगोलीय स्थिती पुन्हा बुधवार, १० फेब्रुवारी २०२७ रोजी नागपूरकरांना अनुभवता येणार आहे