ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला

By नरेश डोंगरे | Updated: July 22, 2025 19:44 IST2025-07-22T19:43:54+5:302025-07-22T19:44:38+5:30

Nagpur : रेल्वे स्थानकावर आरपीएफची कामगिरी

Operation Nanhe Farishte: Missing schoolboy from Mumbai found in Nagpur | ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला

Operation Nanhe Farishte: Missing schoolboy from Mumbai found in Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मुंबईत अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या शाळकरी मुलाला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी नागपूर स्थानकावर ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सायंकाळी या मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

येथील आरपीएफला शनिवारी रात्री ठाणे, मुंबई पोलिसांकडून ११ वर्षीय मुलाची सचित्र माहिती मिळाली होती. एपीएमसी पोलिस स्टेशन मुंबई येथे या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असून तो नागपूरकडे जाणाऱ्या गाडीत असण्याची शक्यताही मुंबई पोलिसांनी वर्तविली होती. त्यानुसार, रविवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले आरपीएफचे एएसआय बी.के. सरपटे आणि अंमलदार पिंटू कुमार यांना फलाट क्रमांक तीनवर एक मुलगा सैरभैर अवस्थेत दिसला. त्याची ती अवस्था बघून सरपटे आणि पिंटूने त्याला जवळ घेतले. त्याची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर तो मुलगा बोलू लागला. त्याने सांगितल्याप्रमाणे, पीयूष (वय ११ वर्षे, नाव काल्पनिक, रा. मुंबई) नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. अचानक दोघांनी त्याच्या चेहऱ्यावर कपडा टाकून त्याला बेशुद्ध केले. नंतर त्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो ठाणे रेल्वे स्थानकावर एका ट्रेनमध्ये होता. भीतीमुळे तो तसाच बसून राहिला आणि नंतर रविवारी तो नागपूर स्थानकावर पोहोचला. आपल्याला कुटुंबीयांची आठवण येत असून आई-वडिलांकडे जायचे आहे, असेही त्याने आरपीएफच्या जवानांना सांगितले. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून अपहृत मुलाची माहिती मिळाली होती, तो हाच मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक आरपीएफने ही माहिती मुंबई पोलिस तसेच चाईल्ड लाईनला कळविली. त्यानंतर त्याला शासकीय बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

पालकांसह पोलिसही पोहोचले

अपहृत मुलगा नागपुरात मिळाल्याचे आणि तो सुखरूप असल्याचे कळताच पीयूषचे पालक आणि मुंबई पोलिस सोमवारी दुपारी नागपुरात पोहचले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पीयूषला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पीयूष त्याच्या पालकांसह मुंबईकडे रवाना झाला.

ऑपरेशन नन्हे फरिश्ते
अपहरण झालेल्या किंवा घरून वेगवेगळ्या कारणांमुळे पळून गेलेल्या लहान मुलांना हेरून त्यांना चाईल्ड लाईनच्या मदतीने सुखरूप त्यांच्या पालकांकडे सोपविण्याची कामगिरी आरपीएफकडून बजावली जाते. त्यासाठी आरपीएफकडून देशभर 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' नावाने एक सामाजिक उपक्रम राबविला जातो. रविवारी याच उपक्रमांतर्गत आरपीएफने अपहृत पीयूषची सुखरूप घरवापसी केली.

Web Title: Operation Nanhe Farishte: Missing schoolboy from Mumbai found in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.