राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही

By कमलेश वानखेडे | Updated: December 17, 2025 17:03 IST2025-12-17T17:02:11+5:302025-12-17T17:03:21+5:30

Nagpur : निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक

NCP demands 15 percent seats but no response from BJP | राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही

NCP demands 15 percent seats but no response from BJP

नागपूर : भाजपने महायुतीत १५ टक्के जागा सोडाव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केली आहे. मात्र, भाजपकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपचे स्थानिक नेते महायुती न करता स्वबळावरच लढण्यावर ठाम आहेत. यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या समक्ष याबाबत नाराजी व्यक्त केली.

प्रदेश निरीक्षक माजी आ. राजेंद जैन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी गणेशपेठ येथील कार्यालयात कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीला अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश महासचिव प्रशांत पवार, दिलीप पनकुले, तानाजी वनवे, आभा पांडे, बजरंगसिंग परिहार, जावेद हबीब, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, राजेश माटे आदी उपस्थित होेते. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी शहरात पक्षाची ताकद वाढली असल्याचा दावा करीत किमान २२ जागा मिळाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पक्षाकडे सक्षम उमेदवार असलेल्या २५ टक्के जागांचा प्रस्ताव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत प्रत्येक प्रभागात निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी असून कोणत्या जागा लढायच्या याची यादी सादर करण्यात आली. बैठकीनंतर जैन यांनी सांगितले की, महायुती करण्याचे अधिकार मुंबईला आहेत. आम्ही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका व अपेक्षित जागांचा अहवाल प्रदेशकडे पाठवित आहोत. यावर मुंबईत योग्य निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

१९ डिसेंबर नंतर मुलाखती

कोअर समितीच्या बैठकीनंतर सायंकाळी सहाही विभागीय अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीतही निवडणूक तयारीवर चर्चा करण्यात आली. आजवर १३० इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. १९ डिसेंबर रोजी राज्यातील जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीनंतर मुलाखती होतील. उमेदवारी अर्ज भरण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. फाजील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीन वकिलांची टीम सज्ज केली आहे.

Web Title: NCP demands 15 percent seats but no response from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.