नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 11:07 IST2022-06-24T14:42:29+5:302022-06-25T11:07:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला.

नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी
नागपूर : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. यातच, बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी विधानसभा हा मार्ग आहे, त्यामुळे बंडखोरांना त्यासाठी परत यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले होते. यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या धमकीवजा वक्तव्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी नागपुरात निषेध नोंदवला आहे.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली होती. यानंतर, एकच खळबळ उडाली. याचे पडसाद नागपुरातही उमटले.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दुनेश्वरजी पेठे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक गांधी पुतळा सीताबर्डी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. राणे यांना अटक करण्याबाबत सीताबर्डी पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनरवरील फोटोवर संताप व्यक्त केला. तसेच राणे यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.