Navodaya Urban Bank scam in Nagpur: Ashok Dhawad surrenders in session court | नागपुरातील नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांचे सत्र न्यायालयात आत्मसमर्पण
नागपुरातील नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांचे सत्र न्यायालयात आत्मसमर्पण

ठळक मुद्देपोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठेविदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांनी सोमवारी दुपारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर धंतोली पोलिसांनी त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले.
बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून धवड व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. प्रकाश शर्मा व विकेश जोशी यांच्या नावाने प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयाचे बनावट कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलासा नाही
अटकपूर्व जामिनासाठी धडपडणारे अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलासा मिळाला नाही. सुरुवातीला सत्र न्यायालयाने धवड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. गेल्या ३१ जुलै उच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे धवड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तेथेही त्यांना दणका बसला. त्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आता ते एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतील.

यांची चौकशी
या प्रकरणात अशोक धवड यांच्यासह बँक संचालिका किरण धवड, संचालक विजय जोशी, गोविंद जोशी, मुकेश जोशी, राकेश जोशी, विकेश जोशी, प्रकाश शर्मा, सचिन मित्तल, प्रीती मित्तल, बालकिशन गांधी, लिना गांधी, हिंगल ग्रुप, झाम ग्रुप, ग्लॅस्टोन ग्रुप, सिगटिया ग्रुप, देवघरे बिल्डर्स, सोमकुवर ग्रुप, गुलरांधे ग्रुप, पिरॅमिड ग्रुप व ३० कर्जदारांची या घोटाळ्यात काय भूमिका आहे याची चौकशी पोलीस करणार आहे. धवड यांचा ताबा मिळाल्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील असे सुत्रांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Navodaya Urban Bank scam in Nagpur: Ashok Dhawad surrenders in session court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.