Nagpur: रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर कडेकोट बंदोबस्त, प्रवाशांची कसून तपासणी

By नरेश डोंगरे | Updated: May 11, 2025 22:31 IST2025-05-11T22:30:15+5:302025-05-11T22:31:26+5:30

Nagpur Railway Station: नागपूर शहर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर दोन दशकांपूर्वीपासून आहे.

Nagpur: Strict security inside and outside the railway station, thorough screening of passengers | Nagpur: रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर कडेकोट बंदोबस्त, प्रवाशांची कसून तपासणी

Nagpur: रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर कडेकोट बंदोबस्त, प्रवाशांची कसून तपासणी

भारत- पाकिस्तानमधील तणाव आणि त्यामुळे होणारे संभाव्य घातपाताचे धोके लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे.

नागपूर शहर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर दोन दशकांपूर्वीपासून आहे. नागपूर रेल्वेस्थानकाचेही नाव दहशतवाद्यांच्या टार्गेट लिस्टमध्ये आहे. त्यासंबंधाने सुरक्षा यंत्रणांकडून अधूनमधून अलर्टही दिला जातो. सध्या भारत-पाकिस्तानमधील युद्धाची स्थिती लक्षात घेता देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाला दहशतवाद्यांकडून टार्गेट करण्यासंबंधीची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरमधून देशाच्या चारही दिशांमध्ये रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे रोजच नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशातच दहशतवादी आपले कलुषित मनसुबे साध्य करू शकतात. ते लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून येथील प्रशासनाला सुरक्षेच्या अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना रोजच्या रोज मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या आत आणि बाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. नियमित रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तावर आहेच. त्याशिवाय, साध्या वेषातील सुरक्षा जवानही संशयीतांचा वेध घेत आहेत. शस्त्रधारी जवानांचाही मोठा बंदोबस्त आहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या जवळच्या लगेजचीही कसून तपासणी केली जात आहे.

डॉग स्कॉडही मदतीला
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसोबतच प्रत्येक गाडीच्या कोचमध्ये आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तपासणी करीत आहेत. स्थानक परिसर किंवा गाड्यांच्या आतमध्ये असलेल्या लगेजचा संशय आला तर डॉग स्कॉडच्या मदतीने त्याची तपासणी करून सुरक्षेची खात्री केली जात आहे.

सूचना, समुपदेशनावरही जोर
अशा पद्धतीने सुरक्षेच्या उपाययोजना होत असतानाच प्रवाशांनाही वारंवार सूचना करून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता कुठे काही घातपाताची घटना घडल्यास स्वत:चा बचाव कसा करायचा, कशा पद्धतीने सोबतच्या व्यक्तींची सुरक्षा करायची, जखमींना कशी मदत करायची, त्याबाबतही धडे दिले जात आहेत.

Web Title: Nagpur: Strict security inside and outside the railway station, thorough screening of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.