खारबी चौकातील अपघाताने नागपूर हादरलं ! भरधाव बसच्या धडकेत ट्यूशनहून परतणाऱ्या भाग्यश्रीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:42 IST2025-10-07T20:40:21+5:302025-10-07T20:42:18+5:30
Nagpur : भाग्यश्री सकाळी ट्यूशनवरून परतत असताना ही दुःखद घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात बसने दुचाकीला धडक दिल्याचा प्रसंग कैद झाला आहे.

Nagpur shocked by accident at Kharbi Chowk! Bhagyashree, who was returning from tuition, died on the spot after being hit by a speeding bus
नागपूर : नागपूरमधील खारबी चौकाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. १७ वर्षांची भाग्यश्री जियालाल टेंभरे ही दुचाकीवरून जात असताना एका खाजगी बसने तिच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ती जागीच गंभीर जखमी झाली आणि रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला.
भाग्यश्री सकाळी ट्यूशनवरून परतत असताना ही दुःखद घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात बसने दुचाकीला धडक दिल्याचा प्रसंग कैद झाला आहे. अपघातानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातामागील कारणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला असून बसचालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनकडे नागरिकांनी जलद पावले उचलण्याची मागणी केली आहे. याशिवाय रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवणे, चेतावणी फलक लावणे आणि वाहनचालकांवर कडक नियंत्रण ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.