नागपूर रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून जनता खाना बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:59 PM2017-12-01T23:59:31+5:302017-12-02T00:07:28+5:30

महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची पाळी येत आहे.

From Nagpur Railway Canteen Public food missing | नागपूर रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून जनता खाना बेपत्ता

नागपूर रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून जनता खाना बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देगरीब प्रवाशांची गैरसोय२० रुपयात मिळत होते भोजन


ऑनलाईन लोकमत 
नागपूर : महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची पाळी येत आहे.
रेल्वे बोर्डाने देशातील सर्व रेल्वेस्थानकावरील बेस किचनचा ताबा ‘आयआरसीटीसी’ला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचनही ‘आयआरसीटीसी’कडे सोपविण्यात आले. बेस किचनच्या अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर जनाहार उपहारगृह चालविण्यात येते. पूर्वी जनाहार रेल्वेच्या अखत्यारित असताना येथे २० रुपयात प्रवाशांना जनता खाना उपलब्ध करून देण्यात येत होता. यात प्रवाशांना आलूची भाजी, लोणचे आणि आठ पुरी देण्यात येत होते. एका प्रवाशाचे भोजन या जनता खानात व्हायचे. परंतु आयआरसीटीसीने जनाहार उपहारगृहाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जनाहारमध्ये जनता खाना मागण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली. गोरगरीब प्रवाशांसाठी जनता खाना एक मोठा आधार ठरत असताना जनाहारमध्ये पहिल्याच दिवशी जनता खाना न मिळाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर आपला संताप व्यक्त केला.

नाईलाजास्तव घेतले महागडे भोजन
मागील १५ दिवसांपासून आयआरसीटीसीने जनाहारचा ताबा घेतल्यानंतर डागडुजीच्या कारणामुळे जनाहार उपहारगृह बंद होते. शुक्रवारी जनाहार सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी जनता खाना विकत घेण्यासाठी जनाहारकडे धाव घेतली. परंतु तेथे जनता खाना न मिळाल्याने त्यांना नाईलाजास्तव महागडे भोजन विकत घेण्याची पाळी आली. यात त्यांना दुपटीपेक्षा अधिक रक्कम मोजण्याची पाळी आली.

‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
‘आयआरसीटीसी’ने जनाहारचा ताबा घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने कोणत्या नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, याची माहिती शनिवारी घेणार आहो. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याना बोलावून जनता खाना त्यांच्या यादीत आहे की नाही यावरही चर्चा करण्यात येईल.’
-बृजेश कुमार गुप्ता
डीआरएम, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: From Nagpur Railway Canteen Public food missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.