नागपूर पोलिसांची खर्रा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई ; सात लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त
By योगेश पांडे | Updated: October 8, 2025 19:50 IST2025-10-08T19:48:45+5:302025-10-08T19:50:20+5:30
Nagpur : दोन कारवायांत सात लाखांहून अधिकचा माल जप्त

Nagpur Police takes strict action against sellers of kharra, flavored tobacco; Goods worth over seven lakhs seized
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू, सुपारी वापरून खर्रा तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्यास धोकादायक असलेला खर्रा तसेच सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत सात लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त केला. सदर तसेच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने या कारवाया केल्या.
पहिली कारवाई मंगळवारी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. गोंडवाना चौकातील आरबीआय कॉलनीतील इटारसी पुलाजवळ एक व्यक्ती प्रतिबंधित तंबाखू, सुपारीचा वापर करून खर्रा तयार करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता मशिनीद्वारे खर्रा तयार केला जात होता. पोलिसांनी अज्जू राजेंद्रप्रसाद यादव (२५, बैरामजी टाऊन) याच्याकडून १५ किलो खर्रा तसेच ८ मशीन असा २.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी अमरनाथ यादव सोनटक्के यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख,
संजय सिंग, राहुल तसरे, निलेश घोगरे, आशीष बहाळ, दुर्गेश ठाकूर, मोहनसिंग ठाकूर, आशीष जाधव, अंकीत ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दुसरी कारवाई कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. गुन्हे शाखेच्या पथकाकडून कामगार नगर येथील गौसिया मशिदीजवळील गल्ली क्रमांक एक येथे एका कारची झडती घेतली. त्यात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू, पानमसाला आढळून आला. पोलिसांनी मोहम्मद हसीन मोहम्मद शगीर अहमद (३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा भाऊ शेरू उर्फ तहसील शगीर अहमद (३७, उप्पलवाडी, नारी मार्ग) याचा प्रतिबंधित तंबाखू व इतर साहित्य बनविण्याचा कारखाना असल्याचे त्याने सांगितले. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाड टाकली.
पोलिसांनी तेथून पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा असा ५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना खंदारे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप बुआ, गणेश कदम, विजय गिते, चंद्रशेखर गौतम, रुपेश नानवटकर, शेख नजीर, अनीस खान, प्रवीण भगत, प्रमोद बावणे, राजू टाकळकर, गणेश ठाकरे, योगेश महाजन, विशाल नागभिडे, देवचंद थोटे, आशीष पवार, सुनिलकुमार यादव, रोशन तांदुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.