नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 23:50 IST2025-08-28T23:16:40+5:302025-08-28T23:50:57+5:30

नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून ४९ हजारांचा गंडा घालण्यात आला.

Nagpur Mahametro's Finance Director was duped by cyber criminals, had to search for bank number on Google for a lot of money | नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून ४९ हजारांचा गंडा घालण्यात आला. गुगलवर बॅंकेचा ग्राहक सेवा क्रमांक शोधणे त्यांना महागात पडले. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

हरेंद्र रामदेव पांडे (५६) असे फसवणूक झालेल्या संचालकांचे नाव आहे. २० ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलाने पांडे यांच्या गुजरात, वडोदरा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. पांडे यांनी गूगलवरून एसबीआयच्या ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध घेतला. त्यावर सापडलेल्या ८१३१९०३५३४ या क्रमांकावर त्यांनी फोन लावला. मात्र कुणीही फोन उचलला नाही.

थोड्यावेळाने त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला व त्याने तो एसबीआय ग्राहक सेवा विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही फोन का केला होता याची त्याने विचारणा केली. तेव्हा पांडे यांनी बॅंकेत पैसे जमा होत नसल्याची समस्या सांगितली. समोरील व्यक्तीने पांडे यांना मोबाईलवर एक लिंक पाठवून त्यातील ‘कस्टमरसपोर्ट१९’ ही एपीके फाईल पाठविली. पांडे यांनी ती डाऊनलोड केली असता त्यांच्या त्याच खात्यातून ४९ हजार ९९९ रुपये वळते झाले. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे पांडे यांना लक्षात आले. त्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञआत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nagpur Mahametro's Finance Director was duped by cyber criminals, had to search for bank number on Google for a lot of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.