'ऑपरेशन सिंदूर'च्या सुपरहिरोचे देशासाठी सर्वोच्च बलिदान; १० दिवसांपूर्वीच घेतली होती घरच्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:54 IST2026-03-06T17:54:32+5:302026-03-06T17:54:49+5:30

आसामच्या दुर्घटनेत महाराष्ट्राचा शूरवीर फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश शहीद

Nagpur IAF Pilot Purvesh Duragkar Martired in Sukhoi Crash | 'ऑपरेशन सिंदूर'च्या सुपरहिरोचे देशासाठी सर्वोच्च बलिदान; १० दिवसांपूर्वीच घेतली होती घरच्यांची भेट

'ऑपरेशन सिंदूर'च्या सुपरहिरोचे देशासाठी सर्वोच्च बलिदान; १० दिवसांपूर्वीच घेतली होती घरच्यांची भेट

Flight Lt Purvesh Duragkar: आसामच्या कार्बी आंगलाँग भागात सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानाला झालेल्या भीषण अपघातात भारतीय हवाई दलाचे दोन शूर अधिकारी शहीद झाले. यामध्ये नागपूरचे सुपुत्र फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर (२८) यांचा समावेश असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अवघ्या ४ वर्षांच्या सेवेनंतर पूर्वेश यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले.

'ऑपरेशन सिंदूर'चे योद्धा

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वेश दुरागकर हे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा महत्त्वपूर्ण भाग होते. विशेष म्हणजे, पूर्वेश या मोहिमेवर असताना त्यांच्या कुटुंबीयांनाही याची कल्पना नव्हती. पूर्वेश यांचे वडील रवींद्र दुरागकर यांनी सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर १५ दिवसांनी आम्हाला समजले की माझा मुलगा त्या मोहिमेत होता. त्या काळात त्याचा मोबाईलही त्याच्याकडे नव्हता आणि आमचा कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता."

१० दिवसांपूर्वीच घेतली होती कुटुंबाची भेट

नियतीचा खेळ असा की, या अपघाताच्या अवघ्या १० दिवसांपूर्वीच पूर्वेश एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. नागपुरातच शालेय शिक्षण पूर्ण केलेले पूर्वेश अविवाहित होते. आपल्या कामाबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. "तो कधीतरी लढाऊ विमानांच्या वेगाबद्दल आणि त्याच्या सहकाऱ्यांबद्दल उत्साहाने सांगायचा. त्याला सुखोई उडवण्याचा सार्थ अभिमान होता," अशा आठवणी वडिलांनी जागवल्या.

असा घडला अपघात

आसाममधील तेजपूर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पूर्वेश जोराहट एअरबेसवरून कार्यरत होते. गुरुवारी रात्री ७:४२ च्या सुमारास प्रशिक्षणादरम्यान सुखोई-३० विमानाचा संपर्क तुटला. या दुर्घटनेत पूर्वेश यांच्यासह स्क्वॉड्रन लीडर अनुज हे देखील शहीद झाले. रशियन बनावटीचे हे विमान जोराहटपासून ६० किमी अंतरावर कोसळले.

मुलगा गमावल्याचे अतीव दुःख असूनही पूर्वेश यांच्या वडिलांचा स्वाभिमान डगमगला नाही. "माझ्या मुलाने देशाच्या सेवेसाठी बलिदान दिले आहे. प्रत्येकाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी. त्याने आपले स्वप्न पूर्ण केले, पण देशाला हवी तितकी सेवा तो देऊ शकला नाही. त्याची सेवा केवळ ४ वर्षांचीच ठरली, याचे शल्य राहील," असे रवींद्र दुरागकर म्हणाले.

Web Title : 'ऑपरेशन सिंदूर' के हीरो का सर्वोच्च बलिदान, देश के लिए शहीद

Web Summary : फ्लाइट लेफ्टिनेंट पूर्वेश दुरागकर, 'ऑपरेशन सिंदूर' के नायक, असम में सुखोई-30 दुर्घटना में शहीद हो गए। 28 वर्षीय नागपुर निवासी ने चार साल देश सेवा की और सर्वोच्च बलिदान दिया। दुर्घटना से दस दिन पहले ही वह परिवार से मिले थे।

Web Title : Sukhoi Pilot's Supreme Sacrifice: Martyr of 'Operation Sindoor' Remembered

Web Summary : Flight Lt. Purvesh Duragkar, a hero of 'Operation Sindoor,' tragically died in a Sukhoi-30 crash in Assam. The 28-year-old Nagpur native served for four years, making the ultimate sacrifice for India. He visited family just ten days before the accident.