दिल्लीसह अनेक रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या महिलांची टोळी नागपुरात जेरबंद, अर्ध्या तासात दोन चोऱ्या
By नरेश डोंगरे | Updated: May 5, 2025 20:10 IST2025-05-05T20:07:58+5:302025-05-05T20:10:37+5:30
Nagpur Crime News: शेकडो लोकांच्या गर्दीत बिनबोभाट चोऱ्या करून रेल्वे पोलिसांच्या नाकात दम करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्या महिलांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही वेळेतच जेरबंद केले.

दिल्लीसह अनेक रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या महिलांची टोळी नागपुरात जेरबंद, अर्ध्या तासात दोन चोऱ्या
- नरेश डोंगरे
नागपूर - शेकडो लोकांच्या गर्दीत बिनबोभाट चोऱ्या करून रेल्वे पोलिसांच्या नाकात दम करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्या महिलांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही वेळेतच जेरबंद केले. चाैघींच्या या टोळीने नागपूरसह हैद्राबाद, चेन्नई, तिरूपती, रायपूर, बिलासपूर, दिल्लीसह अनेक रेल्वे स्थानकावर धाडसी चोऱ्या केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.
गीता अजय सोलंकी (वय ४९), नितू विकास सोलंकी (वय २६), सोनिया अमर सोलंकी (वय २८) आणि मिनू बोरिया सोलंकी (वय ३०) अशी या चोरट्या महिलांची नावे आहेत. या सर्व महिला भावनगर, गुजरात येथील रहिवासी आहेत. त्यातील नितूला १० महिन्यांची मुलगी तर सोनियाला ९ महिन्यांचे बाळ आहे.
सावज शोधण्यासाठी त्या सतत रेल्वेने विविध प्रांतात फिरत असतात. मोठ्या रेल्वे स्थानकावर उतरायचे. सावज टिपत गर्दीत शिरायचे आणि बेमालूमपणे रोख तसेच दागिने लंपास करून दुसऱ्या प्रांतात पळून जायचे अशी त्यांची कार्यपद्धती आहे. रविवारी रात्री अशाच प्रकारे मुंबईकडे निघालेल्या अरूण पुनमचंद कोटेचा (रा. गांधीपुतळा इतवारी रोड नागपूर) यांच्या पत्नीच्या पर्समधून ४०हजारांची रोकड चोरली. त्याच्या एका तासानंतर परत त्यांनी नेहा अमन वानखेडे (रा. हुडकेश्वर) यांच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. कोटेचा दाम्पत्य बडनेरा येथे पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात चोरीची घटना आली. त्यामुळे त्यांनी बडनेरा स्थानकावर तक्रार नोंदवली. बडनेरा पोलिसांनी नागपूर रेल्वे पोलिसांना कळविले. ईकडे नेहा वानखेडे यांनीही तक्रार दाखल केली. तासाभरात रेल्वे स्थानकावर दोन चोऱ्या झाल्याचे कळताच रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, ठाणेदार गाैरव गावंडे यांनी गंभीर दखल घेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून चाैकशी सुरू केली.
तिसरा हात मारण्याची तयारी
तासाभरात दोन हात मारल्यानंतर पहाटेच्या वेळी तिसरा हात मारून गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील महिला रेल्वे स्थानकावरच थांबल्या होत्या. फलाट क्रमांक सात वरील सीसीटीव्हीत त्या कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आज पहाटेच्या वेळी त्यांना जेरबंद केले. त्यांची चाैकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली देऊन चोरलेली रक्कम तसेच सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांच्या हवाली केले.
चोरीनंतर लगेच हिस्सेवाटणी
चोऱ्या केल्यानंतर या महिला लगेच हिस्सेवाटणी करून घेतात. ४० हजारांची रोकड हाती येताच त्यांनी ती समप्रमाणात वाटून घेतली. दरम्यान, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या टोळीला अटक करण्याची कामगिरी रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे, प्रभारी अधिकारी गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात संजय पटले, पुष्पराज मिश्रा, चंद्रकांत भोयर, भलावी, अजहर अली, अमित त्रिवेदी, प्रविण खवसे, विशाल मिश्रा, अमोल हिंगणे, धम्मपाल गवई आदींनी बजावली.
कारागृहात रवानगी
प्राथमिक चाैकशीत या टोळीने नागपूरसह, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, तिरूपती, रायपूर, बिलासपूर,सिकंदराबाद, विजयवाडा, अहमदाबाद, सूरतसह अनेक रेल्वे स्थानकावर धाडसी चोऱ्या केल्याचीही कबुली दिली. या टोळीमुळे अनेक ठिकाणच्या रेल्वे पोलिसांच्या नाकात दम झाल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यांचे गांभिर्य पाहून न्यायालयाने त्यांना १७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.