योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा चौकार लगावत परत झेंडा फडकाविला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून विधानसभा निवडणुकीनंतर लगेच नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी नगरसेवकांविरोधात नाराजीचा सूर असल्याने भाजपने त्यातील ५०हून माजी नगरसेवकांना धक्का देत नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखविला होता. काटेकोर नियोजन, मायक्रो मॅनेजमेंट, तळागाळातील संपर्क आणि नव्या चेहऱ्यांवर दाखविलेला विश्वास या चार सूत्रांच्या जोरावर भाजपने नागपूर महानगरपालिकेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र काही नेत्यांच्या निकटवर्तीयांना दिलेल्या उमेदवारीमुळे जनतेत काहीसा नाराजीचा सूर निर्माण झाला व त्यामुळे 'मिशन १२०'चा आकडा गाठता आला नाही.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र नियोजनाला सुरुवात केली होती. शहरातील प्रत्येक प्रभागाचा सखोल अभ्यास, मतदारांची सामाजिक-राजकीय स्थिती, स्थानिक प्रश्न आणि कार्यकर्त्यांची ताकद यांचा बारकाईने विचार करून रणनीती ठरविण्यात आली. यामध्ये 'मायक्रो मॅनेजमेंट' हा भाजपचा कळीचा फॉर्म्युला ठरला. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र टीम, बूथनिहाय जबाबदाऱ्या आणि थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर देण्यात आला. सातत्याने तीनदा सत्तेत असल्याने 'अंटी इन्कबन्सी'चा फटका बसू शकतो, याची जाण असल्याने पक्षाने अनेक माजी नगरसेवकांच्या नावावर लाल फुली मारली होती.
तीन वेळा झाला गृहसंपर्क
भाजपच्या शंभराहून अधिक जागांमागे तळागाळातील संपर्क हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरला. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांचा आढावा मांडला. शिवाय पदवीधर मतदारसंघातील नोंदणीचे अर्जवाटप करण्यासाठीदेखील भाजपचे कार्यकर्ते सर्वच प्रभागांत फिरले होते.
म्हणून गाठू शकले नाहीत '१२०' चा आकडा
- भाजपच्या नेत्यांनी १२० जागांवर जिंकण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात हे लक्ष्य गाठणे शक्य नाही, याची कल्पना नेत्यांना होती.
- उत्तर, पश्चिम नागपुरात अनेक ठिकाणी भाजपची बूथ यंत्रणा हवी तशी मजबूत नव्हती.
- भाजपच्या प्रचाराचा सर्व भर 3 मोठ्या नेत्यांच्या कामांवरच होता. मात्र स्थानिक उमेदवारांच्या कार्यकाळातील नाराजी कायम असल्याचे १० ते १५ जागांवरील निकालांतून दिसून आले.
- भाजपने केवळ एकच मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरविला होता. त्यामुळे मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते भाजपपासून दूर गेली.
बंडोबांना केले थंडोबा; पण फटका बसलाच
या निवडणुकीत भाजपने घेतलेला आणखी एक महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय म्हणजे उमेदवार निवडीत केलेला बदल. माजी नगरसेवकांविरोधात अनेक प्रभागांत नाराजीचा सूर होता. याची दखल घेत भाजपने जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांना तिकीट नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. काही माजी नगरसेवकांनी उमेदवारांविरोधात छुपी मोहीम उघडली होती; परंतु पक्षनेत्यांनी ३२ जणांना निलंबित करत अशा सर्व माजी नगरसेवकांकडे बारीक लक्ष असल्याचे स्पष्ट करत कारवाईचा इशारा दिला होता. काही प्रभागांमध्ये बंडखोरांच्या वाट्याला मते गेली आणि त्याचा फटका प्रभाग १४ मधील प्रगती पाटील यांच्यासारख्या भाजप उमेदवारांना बसला.
Web Summary : BJP secured Nagpur election victory with micro-management and new faces. Anti-incumbency and internal dissent hindered 'Mission 120'. Grassroots outreach proved crucial despite rebel impact.
Web Summary : भाजपा ने माइक्रो-मैनेजमेंट और नए चेहरों के साथ नागपुर चुनाव में जीत हासिल की। सत्ता विरोधी लहर और आंतरिक असंतोष ने 'मिशन 120' को बाधित किया। विद्रोही प्रभाव के बावजूद जमीनी स्तर पर पहुंच महत्वपूर्ण साबित हुई।