शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे नागपुरातही

By Admin | Updated: January 6, 2017 02:23 IST2017-01-06T02:23:35+5:302017-01-06T02:23:35+5:30

विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली नागपुरातील अनेक संस्थांनी शासनाकडून लाखोंची रोकड उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

In Nagpur due to scholarship scandal | शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे नागपुरातही

शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे नागपुरातही

जरीपटक्यातील संस्थेची बनवाबनवी उघड : दुसरा गुन्हा दाखल
नागपूर : विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली नागपुरातील अनेक संस्थांनी शासनाकडून लाखोंची रोकड उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी नॅशनल स्टडी आॅफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट(भीम चौक)च्या संस्थाचालक व प्राचार्य आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मंगळवारी असाच एक गुन्हा बजाजनगर पोलिसांनीही दाखल केला होता, हे विशेष!
रोशन दिलीप करवाळे (वय २१, रा. आंबेडकर कॉलनी, कामठी रोड) याला नॅशनल स्टडी आॅफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य आणि संचालकांनी त्याचे शैक्षणिक कागदपत्रे मागितली. त्या कागदपत्रांच्या आधारे रोशनचा संस्थेत प्रवेश दाखवून त्याला कोणतेही शिक्षण न देता शासनाकडून रोशनच्या नावाखाली शिष्यवृत्ती उचलली. ५ मे २०१३ पासून सुरू असलेल्या या बनवाबनवीची माहिती उघड होताच बुधवारी, ४ जानेवारीला रोशनने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी संस्थेच्या आरोपी प्राचार्य, संस्थाचालक आणि संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
यापूर्वी बजाजनगर पोलिसांनी तेलंगखेडी, रामनगरातील रहिवासी विशाल अरुण माटे या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून कुसुमताई वानखेडे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्राचा शिक्षक उमेश लाकडे तसेच स्वामी विवेकानंद मुख्याध्यापकासह संस्थेच्या संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यांनी विशाल आणि अन्य विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून शासनाकडून लाखो रुपये अनुदान उचलले आहे. (प्रतिनिधी)

लोकमतमुळे लक्षवेध : लोकमतने बुधवारी या शिष्यवृत्ती घोटाळ्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. ते वाचनात आल्यामुळे अनेक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आपापल्या संस्थांमध्ये कागदपत्रांची तपासणी केली. रोशननेही याबाबत चौकशी केली तेव्हा फसवणूक उघड झाली. त्यानंतर वरिष्ठांच्या माध्यमातून तो जरीपटका ठाण्यात पोहचला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राज्यात यापूर्वी शिष्यवृत्ती घोटाळ्याने खळबळ उडवून दिली होती. ते प्रकरण शांत झाल्यानंतर आता नागपुरात शिष्यवृत्ती घोटाळ्याचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: In Nagpur due to scholarship scandal