लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवन कॉलनी परिसरातील गुरुवारच्या घटनेत प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी अखेर मध्यरात्रीनंतर या प्रकरणात बीएएमएसची इंटर्नशिप करणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
बालाजी कल्याणे (वय २४, मुदखेड, नांदेड) असे मृताचे नाव आहे, तर रती साहेबराव देशमुख (२५, करंजी, नांदेड) ही आरोपी आहे. रती ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून, ती इंटर्नशिप करीत होती, तर बालाजी पोलिस भरतीची तयारी करीत होता. दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. रती अनेकदा त्याच्या खोलीवर जायची. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली. त्यांचा लग्न करण्याचा मानस होता. मात्र, रतीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे बालाजी अगोदरच तणावात होता. त्याच मुद्द्यावरून गुरुवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा वाद झाला. रतीने तेथील चाकू उचलून बालाजीच्या अंगावर पूर्ण ताकदीनिशी वार केले. त्यात तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. त्याला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली व तिनेदेखील स्वतःवर वार करून घेतले.
सुरुवातीला तिने बालाजीनेच तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी केली. मात्र, बालाजीच्या अंगावर खोलवर घाव होते व त्यातून पोलिसांचा संशय बळावला. तिची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. बालाजीचा भाऊ शिवाजी ऊर्फ ऋषीकेश विनायकराव कल्याणे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हत्येच्या एक दिवस आधी दिला अल्टिमेटम
बालाजीने हत्येच्या एक दिवस आधी अल्टिमेटम दिला होता. जर लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावे लागेल असे त्याने रतीच्या वडिलांना म्हटले होते. बालाजीच्या मोबाइलच्या तपासणीत पोलिसांना हे उघड झाले. आरोपी रतीने तिचा मोबाईल फॉर्मेट केला आहे.
Web Summary : In Nagpur, a woman killed her boyfriend after a marriage dispute. She initially claimed he attacked her, but police investigation revealed the truth. The accused has been arrested.
Web Summary : नागपुर में, एक महिला ने विवाह विवाद के बाद अपने प्रेमी की हत्या कर दी। शुरू में उसने दावा किया कि उसने उस पर हमला किया, लेकिन पुलिस जांच में सच्चाई सामने आई। आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है।