Nagpur Crime : प्रेयसीच्या नावाने चिडवने पडले महाग ! आरोपीने रॉडने हल्ला करीत केली मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:06 IST2026-01-07T20:05:34+5:302026-01-07T20:06:27+5:30
Nagpur : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरात अक्षरशः फिल्मीस्टाइलने हत्या करण्यात आली असून, यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Nagpur Crime: Anger over girlfriend's name cost him dearly! Accused kills friend by attacking him with a rod
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरात अक्षरशः फिल्मीस्टाइलने हत्या करण्यात आली असून, यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दारूच्या नशेत पैसे आणि प्रेयसीवरून वाद झाल्याने आरोपींनी एका तरुणाच्या घरी जाऊन हल्ला केला व त्याची हत्या केली. त्यांनी मृताच्या मित्राच्या आईवडिलांनाही जखमी केले. शहरात मनपा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रितीक सावनलाल पटले (२२, पार्वतीनगर, कळमना) असे मृताचे नाव आहे, तर ईशा हातीम अन्सारी (५५), मुस्तफा उर्फ गोलू ईशा अन्सारी (२८), लुकमान ईषा अन्सारी (२२), साहिल ईशा अन्सारी (२०), सलाउद्दीन ईशा अन्सारी (१९) व एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहेत. आरोपी मुस्तफा, रितीक आणि आणखी एक मित्र तनसू नागपुरे हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जुनी मंगळवारी येथे ट्रिपलसीट दारू पिण्यासाठी गेले होते. परत जात असताना रितीक आणि मुस्तफा यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. रितीकने मुस्तफाला त्याच्या प्रेयसीवरून चिडविले. त्यामुळे मुस्तफा संतापला आणि त्याने शिवीगाळ केली. त्यांच्यात वाद वाढला आणि मुस्तफाने रितीक व तनसूला रस्त्यातच उतरवून दिले.
मुस्तफाने झालेल्या वादाची माहिती स्वतःच्या भावाला सांगितली. त्याच्या भावाने तनसूला फोन करून धमकी दिली. त्यानंतर, आरोपींनी पार्वतीनगर चौकात तनसू आणि रितीकला गाठले व चाकू, तसेच रॉडने हल्ला केला. त्यात सलीम अन्सारी हाही जखमी झाला. हा प्रकार पाहून तनसूचे आईवडील शिवप्रसाद नागपुरे आणि आई संगीता यांनी धाव घेतली. आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. वस्तीतील नागरिक गोळा झाल्यावर आरोपी फरार झाले. सर्व जखमींना मेयो इस्पितळात नेण्यात आले. रितीकचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला, तर इतरांवर उपचार सुरू आहेत. तनसूच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला व सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोलू आणि रितीकमध्ये अगोदरही वाद झाला होता. त्यावरून त्यांच्यात मतभेद होतेच.