Nagpur Accidet: भरधाव ट्रक अंगावरून गेला, मुलीने जागेवरच सोडला जीव; वडील गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:18 IST2025-10-02T17:17:33+5:302025-10-02T17:18:24+5:30
Nagpur latest News: नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका मुलीचा, तर एका तरुणाचा मृत्यू झाला.

Nagpur Accidet: भरधाव ट्रक अंगावरून गेला, मुलीने जागेवरच सोडला जीव; वडील गंभीर जखमी
Nagpur Accident News : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे वडिलांसोबत जात असलेल्या १९ वर्षीय मुलीचा मृत्यू होऊन वडील गंभीर झाल्याची, तर यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवर जाणाऱ्या दोन मित्रांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे एका मित्राचा मृत्यू, तर एक मित्र गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १:५० वाजता संजय यशवंत कावळे (५४, रा. विनोबानगर, दिघोरी उमरेड रोड) हे त्यांच्या अॅक्टिव्हा गाडीने (क्रमांक एम. एच. ४९, वाय-११२८) मुलगी साक्षी (१९) सोबत रिवाज लॉन समोरील उड्डाणपुलावरून जात होते.
तेवढ्यात आयशर ट्रकच्या (क्रमांक एम. एच. ४०, बि. एल-६७६४) चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून कावळे यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने धडक दिली.
ट्रकचा टायर गेला अंगावरून
यात साक्षीच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कावळे यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम २८१, १०६, १२५ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे.
दुचाकीवरील दोनपैकी एका मित्राचा मृत्यू
यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेत बादल राऊत (२९) व त्याचा मित्र संदीप शेषराव धारपुरे (२९) हे दोघे दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, सी. पी-१५२१ ने बिग मार्केट समोरून जात होते. तेवढ्यात ट्रक क्र. एम. एच. ३१, एफ. सी-३०७७ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून बादलच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी बादलला तपासून मृत घोषित केले. जखमी संदीप धारपूरेवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी भक्तराज विश्राराम राऊत (५३, रा. गजानन मंदीराजवळ, म्हाळगीनगर, हुडकेश्वर) यांच्या
तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम २८१, १०६, १२५ (अ), सहकलम १३४, १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.