लग्नासाठी दबाव; युवकाची हत्या, आरोपीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:48 AM2023-06-29T11:48:07+5:302023-06-29T11:52:41+5:30

हिमांशूच्या बहिणीची तीन वर्षांपासून निखिलसोबत मैत्री होती. दोन्ही परिवाराच्या संमतीने ते लग्नही करणार होते; परंतु काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांचे संबंध बिघडले.

Murder of a young man who pressured him for marriage, three arrested along with the accused | लग्नासाठी दबाव; युवकाची हत्या, आरोपीसह तिघांना अटक

लग्नासाठी दबाव; युवकाची हत्या, आरोपीसह तिघांना अटक

googlenewsNext

नागपूर : बहिणीवर लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी भावाने आपल्या साथीदारांसह युवकाची हत्या केली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री १२.३० ते १२.५० च्या दरम्यान घडली.

निखिल साहू उके (वय २९, रा. रमानगर), असे मृत युवकाचे नाव आहे. तर हिमांशू प्रदीप मून (वय २३ रा. रामनगर), अंकित उर्फ अॅनी नीलेश वाघमारे (वय २५) आणि विशाला लक्ष्मण फुलमाळी (वय २२) दोघे रा. कौसल्यानगर अशी आरोपींची नावे आहेत. निखिल मॉलमध्ये काम करीत होता. घटनेचा सूत्रधार हिमांशू त्याचा नातेवाईक आहे. हिमांशू गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. 

हिमांशूच्या बहिणीची तीन वर्षांपासून निखिलसोबत मैत्री होती. दोन्ही परिवाराच्या संमतीने ते लग्नही करणार होते; परंतु काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांचे संबंध बिघडले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. मुलीनेही निखिलशी बोलणे बंद केले. यामुळे निखिलने मुलीला नाते तोडण्याचे कारण विचारले. मुलीने याबाबत तिचा भाऊ हिमांशू आणि कुटुंबीयांना सांगितली. त्यामुळे हिमांशू निखिलवर संतापलेला होता. त्याने निखिलला आपल्या बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले. निखिलने त्याच्याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे हिमांशूने निखिलला धडा शिकविण्याचे ठरविले. हिमांशूने आखलेल्या योजनेनुसार मंगळवारी रात्री निखिलला फोन करून चर्चा करण्यासाठी येण्यास सांगितले. 

परंतु, हिमांशूने वारंवार फोन करून त्याला बोलावले. रात्री १२ वाजता निखिल आपल्या दोन मित्रांसोबत बाइकवर दारू पिण्यासाठी जात होता. दरम्यान, हिमांशूचा फोन आल्यामुळे तो ८५ प्लॉट येथील गल्ली नंबर सातजवळ पोहोचला. तेथे हिमांशू दोन साथीदारांसह त्याची वाट पाहत होता. त्यांनी निखिलच्या दोन्ही मित्रांना आम्हाला निखिलशी खासगी बोलायचे असल्याचे सांगून जाण्यास सांगितले. आरोपींच्या बोलण्यास निखिल आणि त्याच्या मित्रांनी गांभीर्याने घेतले नाही. दोन्ही मित्र तेथून निघून गेले. त्यानंतर आरोपी चर्चा करण्याच्या बहाण्याने निखिलला गल्लीजवळ फिरवत होते.

शस्त्राने छातीवर, पोटावर केले वार

आरोपींनी संधी साधून धारदार शस्त्राने निखिलच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार करून त्याला रक्तबंबाळ केले. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी हिमांशूला मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. अजनीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Murder of a young man who pressured him for marriage, three arrested along with the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.