भावापेक्षा पैसे मोठा ! थोरल्या भावाने विटांनी ठेचून केली धाकट्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:10 IST2026-01-02T16:08:53+5:302026-01-02T16:10:15+5:30
येनवा येथील घटना : पैशावरून उद्भवले भांडण, विटांनी केले वार

Money is bigger than brother! Elder brother kills younger brother by crushing him with bricks
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून दोन सख्ख्या भावांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि याच कारणावरून उद्भवलेल्या भांडणात थोरल्याने धाकट्याला विटांनी वार करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या धाकट्या भावाचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी थोरल्या भावास अटक केली. ही घटना काटोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येनवा येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (दि. ३१) रात्री घडली.
हरीश किसना काळे (३२) असे मृताचे तर राजेश किसना काळे (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. हरीशला राजेशसोबतच नीलेश नावाचा भाऊ असून, तिघेही येनवा, ता. काटोल येथे राहतात. मागील काही दिवसांपासून हरीश व राजेश यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद निर्माण झाला होता. बुधवारी रात्री ९:३० ते १० वाजताच्या दरम्यान त्या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. या भांडणात राजेशने हरीशला मारहाण करीत विटांनी वार केले. त्यामुळे हरीशला गंभीर दुखापत झाली.
काही प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्याने ठाणेदार रणजित शिरसाठ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. तोपर्यंत राजेशने गावातून पळ काढला. याच काळात नागरिकांनी हरीशला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रथमोपचारानंतर त्याला काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी पराग पोटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली.
याप्रकरणी काटोल पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपी अटक करण्यात सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम, उपनिरीक्षक कृष्णा गोंगले, हवालदार संतोष राठोड, कैलास उईके, प्रवीण पवार, संतोष बाट, गौरव बखाल, दशरथ पवार, रितेश मारशेट्टीवार, मयूर घोडखांदे, विजय बावणे यांनी विशेष कामगिरी बजावली.
तीन तासांत आरोपी जाळ्यात
आरोपी राजेश हा येनवा गावालगतच्या जंगलाच्या दिशेने पळून गेल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी रात्रीच्या अंधारात याच भागात त्याचा शोध घेणे सुरू केले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तो जंगलात पोलिसांच्या हाती लागला. अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी (दि. १) काटोल शहरातील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला शुक्रवार (दि. २) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.