साक्षगंधाच्या कार्यक्रमात मिर्झापूरसारखा थरार ! एका व्यक्तीला घेरून सात जणांनी केले वार, शंकरपट हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:02 IST2025-11-24T18:57:57+5:302025-11-24T19:02:18+5:30
एकजण गंभीर जखमी : सातजणांना घेतले ताब्यात

Mirzapur-like thrill at Sakshgandha event! Seven people surrounded a person and attacked him, Shankarpat was shaken
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : साक्षगंधाच्या कार्यक्रमात पाहुण्यांचे जेवण सुरू असताना पाच-सहा जणांनी हातात चाकू घेऊन एका व्यक्तीस घेरले व भांडणाला सुरुवात केली. याच भांडणात देशीकट्ट्यातून झाडलेल्या गोळ्या मांडी व छातीत शिरल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. गोळीबारानंतर उडालेल्या गोंधळात काही पाहुण्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहपानजीकच्या शंकरपट या गावात रविवारी (दि. २३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली असून, घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. बाल्या हिरामण गुजर (रा. कुही) असे गंभीर जखमीचे नाव असून, पोलिसांनी देवा ऊर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ, तपन पिसाराम एकनाथ, आकाश पिसाराम एकनाथ, मोरेश्वर पिसाराम एकनाथ या चार सख्ख्या भावांसह सावन काशीराम एकनाथ, काशीराम बाबूराव एकनाथ, दिनेश सनेश्वर (सर्व रा. सेलू, ता. कळमेश्वर) या सातजणांना ताब्यात घेतले आहे. देवा ऊर्फ परमेश्वर हा मुख्य आरोपी असून, इतर त्याचे साथीदार आहेत.
शंकरपट, ता. कळमेश्वर येथे रविवारी साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बाल्या त्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून आला होता. देवासह त्याचे भाऊ व साथीदारदेखील त्या कार्यक्रमाला आले होते. देवाला बाल्या दिसताच तो त्याच्याशी भांडण करण्याची संधी शोधत होता. साक्षगंध आटोपल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करायला बसली देवा व त्याच्या साथीदारांनी बाल्याला बोलावून घेराव करीत त्याच्याशी भांडण उकरून काढले.
काहींच्या हातात चाकू होते तर देवाने सोबत देशीकट्टा आणला होता. याच भांडणात देवाने बाल्यावर गोळीबार केला. एक गोळी बाल्याच्या छातीत तर दुसरी मांडीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. काही वेळात गोळीबारात सहभागी असलेल्या सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
अपहरणाचा वचपा
बाल्या व देवा यांची आपसात ओळख असून, त्यांचे आर्थिक व्यवहार चालायचे. काही दिवसांपूर्वी पैशाच्या वादातून बाल्याने देवाचे अपहरण केले होते. या अपहरणाचा वचपा काढण्यासाठी त्याने बाल्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गोळीबारानंतर गोंधळ उडाल्याने बाल्याचा भाऊ सुनील गुजर, मुकेश मापूर यांच्यासह इतर पाहुणेदेखील जखमी झाले.