मिहान कर्मचारी अपघात; चार कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 10:45 PM2020-12-25T22:45:33+5:302020-12-25T22:45:54+5:30

Nagpur News मिहानमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा चिचभुवनच्या जवळ शुक्रवारी पहाटे काळाने झडप घातली. या अपघाताने चार कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत.

Mihan employee accident; Four families devastated | मिहान कर्मचारी अपघात; चार कुटुंबे उद्ध्वस्त

मिहान कर्मचारी अपघात; चार कुटुंबे उद्ध्वस्त

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मिहानमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा चिचभुवनच्या जवळ शुक्रवारी पहाटे काळाने झडप घातली. या अपघाताने चार कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचा आक्रोश शब्दातीत आहे. मृतांपैकी पीयूष त्याच्या आईवडिलांचा एकमात्र आधार होता. तो चार महिन्यांपूर्वीच कंपनीत लागला होता. त्यामुळे कुटुंबीय स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात होते. नेहाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. तिला अंकित आणि प्रियांशू नामक दोन भाऊ आहेत. आईवडील मिळेल ते काम करतात. सहा महिन्यांपूर्वी नेहाला नोकरी मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा आधार झाला होता. मात्र, नेहासोबत तो आधार हिरावला गेल्याने आईवडिलांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पायलला आईवडील आणि बहीण आहे. तिच्या कुटुंबीयांचा आक्रोशही पाहवला जात नव्हता. तर वाहनचालक उईकेला वृद्ध वडील, पत्नी, मुलगी आणि एक भाऊ आहे. उईके कुटुंबातील तो एकमात्र कमावता व्यक्ती होता. कंपनीकडून या चार जिवांचे मोल कसे चुकविले जाते, त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दोष कुणाचा, पत्ता नाही

या भीषण अपघाताला कोण दोषी आहे, ते कळायला मार्ग नाही. अपघातातून वाचलेला एकमात्र आशीष सरनायकची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे हा अपघात कसा झाला, ते पोलिसांना कळलेले नाही. माहिती कळाल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त नुरूल हसन, गुन्हे शाखेचे गजानन शिवलिंग राजमाने आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग अवाड, सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांनी अपघातस्थळी भेट देऊन हा अपघात कसा झाला, कारला धडक देणारे दुसरे वाहन कोणते, त्याचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत ते स्पष्ट होऊ शकले नाही. कारची समोरासमोर दुसऱ्या वाहनासोबत धडक झाली की समोर चालणाऱ्या अवजड वाहनावर मागून वेगात असलेली अर्टिका धडकली, त्याबाबत नेमका तर्क काढणे अद्याप शक्य झाले नसल्याचे उपायुक्त नुरूल हसन यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Mihan employee accident; Four families devastated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात