प्रेमात आंधळी झाली ‘मारिया’; लग्नासाठी केली हिऱ्याच्या अंगठीची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:11 IST2025-05-30T17:10:30+5:302025-05-30T17:11:24+5:30
पाळणाघरातून पोलिस स्टेशनपर्यंतचा प्रवास : सीसीटीव्हीने दिला पुरावा

'Maria' was blinded by love; she stole a diamond ring for her wedding
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान बाळाच्या संगोपनाचे काम करीत असताना घरातून सोने व हिऱ्याच्या नऊ लाखांच्या अंगठी गायब करणाऱ्या तरुणीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तिला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. तिने स्वतःच्या प्रियकरासोबत लग्नासाठी अंगठी चोरल्याची कबुली दिली आहे.
मारिया सूर्यराव शुक्ला (वय २५, विनायक नगर, खैरी) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती नूपुर अग्रवाल (३२, कडबी चौक) यांच्या १५ महिन्यांच्या बाळाच्या संगोपनाचे काम करत होती. नूपुर यांनी त्यांची सोन्याची तसेच हिऱ्याची अंगठी बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. ती अंगठी चोरीस गेल्यावर त्यांना मारियावर शंका आली. १८ मे रोजी रात्री साडेआठ वाजता मारियाने दोन्ही अंगठ्या ड्रॉवरमधून काढल्याची बाब सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाली. मारियाविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीदरम्यान मारियाला प्रियकरासोबत लग्न करायचे होते व तिने ५० हजार रुपये उधार मागितल्याचा प्रकार समोर आला. तिने नूपुरची अंगठी आवडल्याचे बोलून दाखविले होते.
प्रियकराजवळ सापडली अंगठी
तिच्या फोनच्या लोकेशनवरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने चोरी केल्याची कबुली दिली. तिने हिऱ्याची अंगठी तिचा प्रियकर पवन बडगुजर याच्याजवळ ठेवल्याचे सांगितले. पोलिसांना ट्रान्सिट रिमांडवर तिला नागपुरात आणले, तर तिच्या प्रियकरालादेखील नाशिकमधून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर, अनंता गारमोरे, मारोती जंगीलवाड, नितीन राणे, प्रमोद सालोटकर, मनीष मेश्राम, विकास पाठक, पवन कामारकर, दीपाली जवादे यांच्या पथकाने ही कारवाई केली.