ममता बॅनर्जींवर २४ तासांसाठी प्रचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:49+5:302021-04-13T04:07:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना केंद्रीय सुरक्षायंत्रणेवरील टीका व ...

Mamata Banerjee banned for 24 hours | ममता बॅनर्जींवर २४ तासांसाठी प्रचारबंदी

ममता बॅनर्जींवर २४ तासांसाठी प्रचारबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना केंद्रीय सुरक्षायंत्रणेवरील टीका व धार्मिक आधारावरील एक वादग्रस्त वक्तव्य भोवले आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या उल्लंघनाची कारवाई करत त्यांना २४ तासांसाठी निवडणूक प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. मागील काही दिवसांपासून ममता सातत्याने आयोगावर आरोप करत होत्या. त्यामुळे आता त्यांना एक दिवस प्रचारापासून दूर राहावे लागणार आहे.

तिस-या व चौथ्या टप्प्यांत झालेला हिंसाचार केंद्रीय सुरक्षा दलाच्या हलगर्जीमुळे झाला असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. याशिवाय, एका निवडणूक प्रचारसभेत त्यांनी धार्मिक आधारावर भाष्य करत विरोधकांवर टीका केली होती. आयोगाने यासंदर्भात कारवाईचे पाऊल उचलले. संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण करणा-या अशा वक्तव्यांची आम्ही निंदा करतो. आचारसंहिता लागू असल्याने ममता बॅनर्जी यांनी असे वक्तव्य करण्याचे टाळावे, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले. १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते १३ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत ममता बॅनर्जी यांना प्रचारबंदी करण्यात आली आहे.

ममतादेखील आक्रमक

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाचा निर्णय असंवैधानिक व लोकशाहीच्या विरुद्ध आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून मंगळवारी दुपारी १२ वाजता कोलकात्यातील गांधी मूर्तीजवळ धरणे आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mamata Banerjee banned for 24 hours