पेंच व्याघ्र प्रकल्पातही टोळधाडीचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:38 IST2020-06-09T20:37:12+5:302020-06-09T20:38:58+5:30
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या टोळधाडीचा प्रकोप थांबल्याचे सांगितले जात असतानाच आता पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीने शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील कोलीतमारा भागातून टोळधाड प्रवेशली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातही टोळधाडीचा शिरकाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या टोळधाडीचा प्रकोप थांबल्याचे सांगितले जात असतानाच आता पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीने शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील कोलीतमारा भागातून टोळधाड प्रवेशली. तिचा फैलाव जंगलाच्या अनेक भागात झाला असला तरी हे संरक्षित क्षेत्र असल्याने कीटकनाशकाची फवारणी टाळण्यात आली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जूनला प्रकल्पाच्या पश्चिमेकडच्या कोलीतमारा भागातून टोळधाडीचा प्रवेश झाला. दुपारनंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेकडील भागात बोरबन, चोरबाहुली, सिलारी, पिपरिया भागात टोळधाड आली.
हा प्रकार लक्षात येताच तातडीने वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व कृषी विभागाला माहिती देण्यात आली. ही टोळधाड आता कुठल्या भागात सरकते, याबद्दल कृषी विभाग व वन विभाग यांच्या समन्वयातून निरीक्षण सुरू आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र असल्याने या ठिकाणी कीटकनाशकांचा वापर टाळल्याचे गोवेकर यांनी सांगितले. तसेच त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्नही केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी ९ जूनला दुपारी पाऊस झाला. त्यामुळे टोळधाडीने आता आपला मोर्चा मनसर भागाकडे वळवला.
टोळधाडीचे निरीक्षण करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकांनी मंगळवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली. सहायक वनसंरक्षक अतुल देवकर व इतर संबंधित क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी यावेळी उपस्थित होते होते. पेंचमधील प्रभावित भागाची पाहणी करण्यात आली असून कुठेही मोठ्या स्वरूपात हानी नाही. सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.