मिहान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ, वन विभागाने लावला कॅमेरा ट्रॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 00:11 IST2025-10-08T00:11:10+5:302025-10-08T00:11:30+5:30
Leopard In Mihan Area: नागपूर शहरालगतच्या मिहान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्याच्या हालचाली एका कारमधील तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केल्या. हा व्हिडीओ आज सोशल मिडियात व्हायरल झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिहान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ, वन विभागाने लावला कॅमेरा ट्रॅप
नागपूर - शहरालगतच्या मिहान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्याच्या हालचाली एका कारमधील तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केल्या. हा व्हिडीओ आज सोशल मिडियात व्हायरल झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वत्र खळबळ निर्माण करणाऱ्या या व्हिडीओमुळे नागपूर वन विभागानेही त्याची दखल घेतली असून मिहानमधील संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. हिंगणा, बुुटीबोरी आणि सेमिनरी हिल्स वन परिक्षेत्रात वन विभागाच्या पथकांना आलटून पालटून नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मिहानचा परिसर हिंगणा, बुटीबोरी आणि सेमिनरी हिल्स या तीन वन परिक्षेत्रात येतो. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची तपासणी करण्यात आल्यानंतर ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळला तो परिसर टीसीएस कंपनीचा असल्याचा अंदाज बांधण्यात आला. या परिसरा जवळच एम्स हॉस्पिटलसह अनेक कंपन्यांची कार्यालय आहेत. त्यामुळे रात्रंदिवस नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा त्या भागात वावर असतो. त्याच भागात आता बिबट्याही फिरत असल्याचे दिसून आल्याने सर्वत्र खळबळ तसेच दहशत निर्माण झाली आहे. त्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी भितीग्रस्त नागरिकांची मागणी आहे.
यापुर्वीही आढळला बिबट अन् वाघ
मिहानच्या परिसरात यापुर्वीही बिबट आणि वाघ भ्रमण करताना आढळले आहेत. २०२१ मध्ये शहरातील आयटी पार्क परिसर, कृषी महाविद्यालय ते महाराजबाग परिसरात बिबट्या फिरताना आढळला आहे. गोरेवाडा दाभा परिसरातही अनेकदा बिबट्याचा वावर आढळला आहे.