कळमेश्वर शहर होणार नागपूरचे सॅटेलाइट सिटी ; रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पायाभरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:52 IST2025-10-25T17:46:11+5:302025-10-25T17:52:15+5:30
Nagpur : कळमेश्वर शहरातील लेवल क्रॉसिंग क्रमांक २८९ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वनटाइम इम्प्रुव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पांची पायाभरणी शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाली.

Kalmeshwar city to become Nagpur's satellite city; Foundation stone laid for railway flyover work
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वर हे शहर एक सॅटेलाइट सिटी म्हणून विकसित होईल. त्याचप्रमाणे येथील हातमाग व्यवसायाच्या माध्यमातून हे शहर जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.
कळमेश्वर शहरातील लेवल क्रॉसिंग क्रमांक २८९ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वनटाइम इम्प्रुव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पांची पायाभरणी शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आ. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे, अशोक मानकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी आर. पी. सिंग, प्रकल्प संचालक सी. सिन्हा उपस्थित होते. गडकरी म्हणाले, धापेवाड्यामध्ये टेक्सटाइल क्लस्टर तयार झाले असून, त्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन हातमागावरील साड्या तयार होत आहेत.
याचप्रकारे हातमागाला चालना जर कळमेश्वर शहरात मिळाली तर कळमेश्वर तसेच धापेवाडा हे हातमागाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कळमेश्वर तालुक्याने सुद्धा दूध उत्पादनामध्ये पुढाकार घेणे आवश्यक असून, बुटीबोरी येथील मदर डेअरीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून कळमेश्वरमधील दूध उत्पादकांना फायदा मिळू शकतो, असे गडकरी यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज देवके, प्रतीक कोल्हे, अजय बोरे, धनराज मंडलिक, कैलास बांबल, प्रकाश वरुळकर, सचिन रघुवंशी, प्रवीण काथोटे, मनीषा लंगडे, सविता नाथे, सुनीता मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
असा आहे प्रकल्प
५५ कोटी रुपयांच्या तरतुदीने सेतुबंधन योजनेंतर्गत येणाऱ्या सुमारे ५३६ मीटर लांबीच्या रेल्वे उड्डाणपुलामुळे या रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वेच्या वाहतुकीमुळे वारंवार बंद होणाऱ्या रेल्वेगेटपासून कळमेश्वरवासीयांना दिलासा मिळणार असून, पर्यायाने त्यांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. 'वनटाइम इम्प्रुव्हमेंट' अंतर्गत सुमारे २६ कोटी रुपयांच्या तरतुदी अंतर्गत ९.५ किमी रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा, रस्त्यांचे व्हाइट टॉपिंगसह मजबुतीकरण, ड्रेनेज वाहिनींची सुधारणा, पुलांची पुनर्बाधणी, पादचारी मार्ग तसेच बसथांबे, पथदिवे आणि जलनिस्सारण सुविधा या प्रकल्पात समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे कळमेश्वर शहरातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातमुक्त प्रवास सुनिश्चित होणार आहे.