पोळ्याच्या सणावर महागाईची ‘झालर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:34 AM2018-09-09T00:34:03+5:302018-09-09T00:38:58+5:30

पोळा... बळीराजासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण. यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळे हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाईचे सावट आहे.

Inflation inched up on easing | पोळ्याच्या सणावर महागाईची ‘झालर’

पोळ्याच्या सणावर महागाईची ‘झालर’

googlenewsNext
ठळक मुद्देसाहित्यांचे दर वाढले : लाकडी बैल महाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोळा... बळीराजासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण. यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळे हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाईचे सावट आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढल्यामुळे रविवारी साजरा होणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचे दर वाढले आहे. बाजारात पोळ्यासाठी साहित्य विकणाऱ्यांची गर्दीही कमी आहे. इतवारी आणि गांधीबाग बाजारात साहित्यांची खरेदी दुपटीने करावी लागत असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा बाजारात मंदीचे वातावरण आहे.
यंदा पाऊस चांगला आला, पण आॅगस्टमध्ये खंडित झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांजवळ पैसाच नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांना पाळीव व जीवलग असलेल्या बैलांचा पोळा सण कसा साजरा करावा, याची चिंता आहे. दोन बैलांची सजावट करताना किमान दोन हजार रुपयांचा खर्च येतो. श्रीमंत शेतकरी पाच हजार रुपयांपर्यंत खर्च करतात. ट्रॅक्टरचा उपयोग वाढल्यामुळे काही वर्षांपासून पोळ्याचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. यंदा शेतकऱ्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

साहित्यांच्या दरात वाढ
बाजाराचा फेरफटका मारला असता साहित्यांच्या दरांमध्ये झूल ४०० ते ५०० रु., घुंगरू १०० रु., चौरंग मटाटे २०० रु., रेशमी दोर २०० रु.जोडी, गेठे १२० रु. जोडी, म्होरके १०० रु. जोडी, वेसण १०० रु. जोडी, सुताचे पेरे १५० रु. जोडी, गोंडे ७० रु. जोडी, रंगाची डबी ५० ते २०० रुपयांत उपलब्ध आहे.

ट्रॅक्टरच्या वापरांमुळे बैलांची संख्या घटली
बहादुरा येथे पिढ्यान्पिढ्या शेती करणारे केशव आंबटकर म्हणाले, आॅगस्ट महिन्यात पाऊस खंडित झाल्यामुळे पिकाची स्थिती नाजूक आहे. यंदाचा पोळा नव्या बैलजोडीसह साजरा करण्याचे स्वप्न पाहात होतो. पण यंदा हाताशी पैसा नाही आणि त्यात वाढत्या महागाईमुळे नवीन बैलजोडी खरेदी करणे शक्य नाही. नागपूरलगतच्या धारगावचे सुनील तडस यांच्यानुसार, ५५ घरांची वस्ती असलेल्या गाावात पाच ते सहा वर्षांपूर्वी ४० बैलजोड्या होत्या. मात्र आज केवळ सात जोड्या उरल्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्या दोन जोड्या आहेत.

तान्हा पोळ्याचे लाकडी बैल महाग
अमावस्येच्या दुसºया दिवशी, भाद्रपद प्रतिपदेला विदर्भात तान्हा पोळा साजरा केला जातो. नागपुरात यादिवशी विविध मैदानांवर पोळा भरवला जातो. लहानगे त्यामध्ये आपापला लाकडाचा बैल घेऊन सहभागी होतात.

यंदा किमती वाढल्या
यंदा महाल मध्यवर्ती बाजारात विविधरंगी व विविध आकाराचे लाकडी बैल विक्रीस आले आहेत. यंदा किमती दुपटीने वाढल्या आहेत. लहान मुलांसाठी सर्वात छोटा लाकडी बैल यंदा १५० रुपयांचा आहे. त्यानंतर थोडा मोठा ३०० रुपयांचा आहे. चार चाकांच्या लाकडाच्याच ट्रॉलीवर विराजमान असलेले बैल महागच आहेत. अर्धा फूट उंचीचा बैल हा ३०० रुपयांचा असून, लाकडी बैलाच्या किमती लाख रुपयांपर्यंत आहे. मेहनतीने परंपरा जपत असताना महाल बाजारात मनपाचे कर्मचारी आणि पोलीस ऐन सणासुदीला आमच्यावर कारवाई करतात. मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी विक्रीची सोय करून द्यावी, असे महाल येथील विक्रेत्यांनी सांगितले.

सजावटीसाठी पुढाकार
बैलांना सजविण्याची स्पर्धा असते. ही सजावट विविधरंगी झालर, गळ्यात लहान-मोठ्या घंटा, खरड्यांचा मुकुट, मणी आणि विविध शोभिवंत वस्तूंनी करण्यात येते. लहान बैलाला सजविण्यासाठी ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो. जुनी शुक्रवारी या भागात एकत्रितरीत्या तान्हा पोळा रात्रीपर्यंत साजरा करण्यात येतो. अनेक वर्षांची परंपरा असलेले बैल शोभायात्रेत सहभागी होतात. यावेळी लोकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

 

Web Title: Inflation inched up on easing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.