लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताने अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे कृषीच नाही तर उद्योग व आर्थिक धोरणावरही परिणाम होणार आहे. भारताचे धोरण हे अमेरिका ठरवते आरएसएस व भाजपच्या सरकारने या कराराच्या माध्यमातून भारताचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
अॅड. आंबेडकर म्हणाले की, पूर्वी अमेरिकेकडे निर्यात होणाऱ्या वस्तूंवर फक्त अडीच टक्केच निर्यात शुल्क लागत होते. आता १८ टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. तर त्यांच्याकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर शून्य टक्के शुल्क लागणार आहे. सरकारने केलेल्या या करारानुसार अमेरिका उद्योग, आर्थिक धोरणावरसुद्धा लक्ष ठेवेल. हे धोरणही तेच निश्चित करतील. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्यच हिरावले आहे. एपस्टीन फाइलमध्ये नाव आल्यानेच पंतप्रधान मोदी ब्लॅकमेल होत आहे. या करारामुळे मोदींनी भारताला अमेरिकेचे ५१ वे राज्य केल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. एपस्टीन फाइलमध्ये नाव आलेल्यांवर विदेशात कारवाई होत आहे. भारतातील तीन जणांचे नाव आले आहे. परंतु, एकावरही कारवाई झाली नाही असे ते म्हणाले.
रशियाचे स्वस्त तेल व लढाऊ विमानांचा प्रस्ताव का नाकारला ?
रशियाचे स्वस्त तेल खरेदी करणे भारताने बंद का केले आणि रशिया भारताला पाचव्या पिढीतील प्रगत लढाऊ विमाने देणार होते. तो प्रस्ताव भारताने का नाकारला याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली. तसेच अमेरिकेचे इराणसोबत युद्ध झाल्यास अमेरिका भारताच्या जागेचा विमान उतरविण्यास किंवा तेल भरण्यास वापर करेल. त्यामुळे या युद्धात भारताचा अप्रत्यक्ष सहभाग असेल, असेही ते म्हणाले.
फ्रान्सने राफेलचे कोड दिले नाही
भारताने फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी केले. परंतु, या विमानाचे कोड दिले नाही त्यामुळे त्याच्या रडार क्षमतेचा वापर झाला नाही आणि विमान पडले, असा दावाही आंबेडकर यांनी केला. आता पुन्हा ११४ विमाने खरेदी करण्यात येणार आहे. आता कंपनी विमानाचे कोड देतील का, याचाही खुलासा व्हावा. तसेच राफेलचे मुख्य पार्ट बनवणारी कंपनी अमेरिकेने विकत घेतली आहे. उद्या त्या कंपनीने पार्ट देण्यास नकार दिला तर हे विमान फक्त लोखंड ठरेल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्यासाठी २ मार्चला मुंबईत आंदोलन करण्यात येणार असून यात सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले.
Web Summary : Prakash Ambedkar alleges India mortgaged its sovereignty to the US via agreements affecting agriculture, industry, and economic policies. He criticized increased export duties and questioned the rejection of Russia's oil and fighter jet offer. Ambedkar announced a protest for PM Modi's resignation on March 2.
Web Summary : प्रकाश आंबेडकर ने आरोप लगाया कि भारत ने कृषि, उद्योग और आर्थिक नीतियों को प्रभावित करने वाले समझौतों के माध्यम से अमेरिका के पास अपनी संप्रभुता गिरवी रख दी। उन्होंने निर्यात शुल्क में वृद्धि की आलोचना की और रूस के तेल और लड़ाकू जेट की पेशकश को अस्वीकार करने पर सवाल उठाया। आंबेडकर ने 2 मार्च को पीएम मोदी के इस्तीफे के लिए विरोध प्रदर्शन की घोषणा की।