तुमची 'शुगर' वाढली असेल तर 'लिव्हर फेल'चा धोका ! जागतिक संशोधनाने नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:42 IST2026-03-30T19:41:04+5:302026-03-30T19:42:05+5:30
Nagpur : मधुमेह म्हटले की, आपल्याला फक्त रक्तातील साखर किंवा हृदयाच्या आजारांची भीती वाटते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक संशोधनाने नवा खुलासा केला आहे.

If your sugar level is high, you are at risk of liver failure! New revelation from global research
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मधुमेह म्हटले की, आपल्याला फक्त रक्तातील साखर किंवा हृदयाच्या आजारांची भीती वाटते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक संशोधनाने नवा खुलासा केला आहे. टाइप-२ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये यकृत निकामी होण्याचा धोका मोठा असतो. भारतात झालेल्या सर्वात मोठ्या 'दी डाय-फिब-लिव्हर स्टडी' अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या राष्ट्रीय सर्वेक्षणात नागपूर शहरातून मिळालेल्या माहितीचा मोठा वाटा असून, हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य 'द लॅन्सेट' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
प्रख्यात मुधमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता आणि त्यांच्या टीमने या संशोधनासाठी दिलेल्या योगदानामुळे स्थानिक स्तरावरील मधुमेहींची नेमकी स्थिती जागतिक पटलावर आली आहे. जानेवारी ते जुलै २०२४ दरम्यान भारतातील विविध केंद्रांवर हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ९,२०२ प्रौढ मधुमेही रुग्णांची 'व्हायब्रेशन कंट्रोल ट्रान्झिएंट इलास्टोग्राफी' (व्हीसीटीई) द्वारे तपासणी करण्यात आली. यकृताच्या कडकपणाची पातळी मोजून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मधुमेह असलेल्या दर ४ पैकी १ व्यक्तीमध्ये (२६ टक्के) यकृताचा गंभीर आजार आढळला. दर ७ पैकी एका रुग्णामध्ये (१४ टक्के) आजार प्रगत अवस्थेत पोहोचला होता. दर २० पैकी १ रुग्ण (५ टक्के) असा आहे, ज्याचे यकृत निकामी होण्याच्या उंबरठ्यावर होते, परंतु अद्याप निदान झाले नव्हते. लठ्ठ व्यक्तीच नाही, तर 'बीएमआय' २५ पेक्षा कमी आहे अशा १९ टक्के 'नॉन-ओबेस' व्यक्तींत यकृताचा आजार दिसून आला.
यकृतावर चरबी नसली तरीही धोका!
या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे 'स्टीटोसिस' किंवा यकृतावरील चरबी. साधारणपणे यकृतावर चरबी असेल तरच थोका मानला जातो, मात्र या अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांच्या यकृतावर चरबी नव्हती अशा १३ टक्के रुग्णांना आधीच गंभीर 'फायब्रोसिस' होता. यामुळे सध्याच्या केवळ 'फॅटी लिव्हर' तपासण्याच्या पद्धतीला मोठे आव्हान मिळाले आहे.
दक्षिण भारतात ३० टक्के प्रमाण
संशोधनानुसार, दक्षिण भारतात हा धोका सर्वाधिक ३० टक्के तर मध्य भारतात २१ टक्के आढळला. यकृत खराब होण्यामागे प्रामुख्याने लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे असंतुलन, किडनीचे जुने आजार आणि १० वर्षांहून अधिक काळ असलेला मधुमेह ही मुख्य कारणे आहेत.
"मधुमेहाच्या नियमित उपचारांमध्ये यकृताच्या तपासणीचा तातडीने समावेश करावा. केवळ वजन पाहून रुग्णाची तपासणी न थांबवता, सर्व मधुमेही रुग्णांची यकृत चाचणी होणे काळाची गरज आहे. वाढता आजार लक्षात घेता आरोग्य धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे."
- डॉ. सुनील गुप्ता, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ