"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:26 IST2025-10-31T17:25:35+5:302025-10-31T17:26:03+5:30
आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही

"If betrayed, Bachu Kadu will be hanged" Bachu Kadu warns the government, claiming victory in the protest
नागपूर : आम्ही कर्जमाफीचे बोललोच नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही पाच वर्षांचे आश्वसन दिले आहे. पण जे सरकार कर्जमाफीच्या तारखेपासून पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवले. यावर आम्ही वॉच ठेवणार. यात कट कारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही. आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा प्रहारचे नेते माजी आ. बच्चू कडू यांनी दिला.
कर्जमाफीबाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर शेतकरी बच्चू कडू यांच्यासह माजी आ. वामनराव चटप, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी नागपुरात परतले. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता समितीला काही अर्थ नाही. सरकारने कर्जमाफीची तारीख दिली आहे. हा आंदोलनाचा विजयच आहे. दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल. आंदोलन संपलं नाही, कर्जमाफीचा हप्ता जोपर्यंत बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ३१ जून ही तारीख यासाठी केली की यावर्षीचा कर्जदार ३१ मार्चला थकीत होणार आहे. तसेच मार्च नंतर कर्ज घेणारे सुद्धा यात समाविष्ट करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घरी बसून कॉमेंट करू नका
घरी बसून कमेन्ट करणारे काही लोक काहीही आरोप करतात, मॅनेज झाल्याच्या बातम्या पसरवतात. आम्ही आंदोलन केलं आणि आता आरोप सहन करायचे हे किती दुर्दैव आहे. राजू शेट्टी, वामनराव चटप, महादेव जानकर आदी शेतकरी नेत्यांचे आयुष्य खर्ची गेलं आहे. मी अजून जीवंत आहे. काही फसगत झाली तर सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशाराही कडू यांनी दिला.
आठ दिवसात पुन्हा बैठक
मेंढपाळ, दिव्यांग, ग्राम पंचायत कर्मचारी आदी विषयांवर चर्चा राहिली आहे. त्यासाठी आठ दिवसात पुन्हा बैठक होणार आहे, असेही कडू यांनी स्पष केले.
सामान्य नागरिकांची माफी
शेतकऱ्यांच्या हक्क्साठी आंदोलन झाले. आंदोलनं काळात सामान्य नागरिकांना त्रास झाला त्यांची माफी मागतो, असेही बच्चू कडू म्हणाले.