बार संचालकांकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST2021-02-20T04:18:08+5:302021-02-20T04:18:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिलांना बघून अश्लिल शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून झालेल्या वादानंतर चर्चित बॅरल बारच्या भागीदाराने आपल्या साथीदारांसह ...

Hotel owner beaten to death by bar director | बार संचालकांकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण

बार संचालकांकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महिलांना बघून अश्लिल शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून झालेल्या वादानंतर चर्चित बॅरल बारच्या भागीदाराने आपल्या साथीदारांसह हॉटेल सेंटर पॉईंटच्या संचालकाला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत गुन्हा दाखल होऊनही काही जणांनी या गंभीर प्रकरणाचे वृत्त बाहेर येऊ नये म्हणून मोठी दक्षता घेतली. मात्र, गुरुवारी या प्रकरणाचा अखेर बोभाटा झाला. निखिल उर्फ अण्णा दिनेश मुथेरी (वय २७, रा. शारदा चाैक, बोरगाव, गिट्टीखदान), गाैरव संतोष सिंग (वय २४, रा. राठोड लेआऊट, अनंतनगर) आणि प्रेम दिलीप जोरणकर (वय २७, रा. श्री संत ज्ञानेश्वर सोसायटी) अशी आरोपींची नावे आहेत. तर, जखमीचे नाव अंगद ससबितसिंग अरोरा (वय ३३) असून, त्यांचे रामदासपेठेत सेंटर पॉईंट हे तारांकित हॉटेल आहे. आरोपी निखिल अण्णा चर्चित बार बॅरलचा पार्टनर आहे.

अंबाझरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अंगद, तसेच हर्ष उमेश मोहता (वय २७, रा. नारी रिंग रोड, जरीपटका) आपल्या नात्यातील महिलांसह नाष्टा करण्यासाठी शंकरनगर चाैकात गेले होते. तेथे पहाटे ५.३० वाजता आरोपी निखिल अण्णा, गाैरव सिंग आणि प्रेम जोरणकर हे तिघे उभे होते. महिलांकडे बघून त्यांनी अश्लिल शेरेबाजी केली. त्यामुळे हर्ष आणि अंगदने त्याला आक्षेप घेतला. त्यावरून हे दोघे आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना मारहाण सुरू केली. कंबरपट्टा, लाथा - बुक्क्यांनी एकमेकांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. कंबरेच्या बेल्टचा बक्कल लागल्याने यात अंगद अरोरा यांच्या नाकातोंडाला जबर दुखापत झाली.

---

अनेकांनी क्लीप बनविली ?

शंकरनगर चाैकात पहाटेपासून पोह्यांची दुकाने लागतात. तेथे खवय्यांची मोठी गर्दी असते. घटनेच्या वेळी तेथे मोठी वर्दळ असल्याने या घटनेमुळे तेथे एकच खळबळ उडाली. सिनेस्टाईल तुफान हाणामारीची क्लीप बनविण्यासाठी काहींनी मोबाईलही पुढे केले. कुणीतरी अंबाझरी पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांनी हर्ष मोहताच्या तक्रारीवरून रविवारी दुपारी २.३८ वाजता गुन्हा दाखल केला. रात्री या प्रकरणात पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करून त्यांचा १७ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. बुधवारी पीसीआरची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांच्या एमसीआरमध्ये पाठविले.

----

अखेर बोभाटा झालाच

एका गटात चर्चित बारचा पार्टनर आणि दुसऱ्या गटात प्रसिद्ध हॉटेलचा मालक असल्याने प्रकरणात ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’, अशी भूमिका घेतली जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणाचा बोभाटा झाला अन् त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी...’चा गेम फसला. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. आरोपी निखिल अण्णा हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. वादग्रस्त घटनांमुळे त्याचा बारही नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यावर यापूर्वी विनयभंग तसेच दंग्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.

---

Web Title: Hotel owner beaten to death by bar director