नागपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा निघतोय हुक्क्याचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 20:05 IST2025-08-18T20:03:25+5:302025-08-18T20:05:02+5:30

Nagpur : हुक्का पार्लरचालकाचे 'चॅलेंज', कारवाईनंतर तिसऱ्याच दिवशी विक्री सुरू

Hookah smoke is once again coming out of the noses of Nagpur police | नागपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा निघतोय हुक्क्याचा धूर

Hookah smoke is once again coming out of the noses of Nagpur police

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शहरातील काही कॅफेमध्ये सर्रासपणे अवैधपणे हुक्का पुरविला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांची कारवाई झाल्यावरदेखील काही वेळातच परत त्यांच्याकडून हुक्का विक्रीला सुरुवात होते. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सॅफ्रॉन कॅफेमध्ये कारवाई झाल्यावर तिसऱ्या दिवशी परत विक्री सुरू असल्याचे आढळून आले. तीन दिवसांत पोलिसांनी कॅफेमालकासह २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ग्राहकांचादेखील समावेश आहे.


गोकुळपेठेतील सॅफ्रॉन कॅफे येथे दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणेदोन वाजता गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकली होती. त्यावेळी तेथे अवैधपणे ग्राहकांना हुक्का पुरविल्या जात असल्याची बाब समोर आली होती. पोलिसांनी हुक्का पार्लर चालविणारा सैफ लतिफ नागानी (३१, सतरंजीपुरा), फैजान सलिम नागानी (३१, सतरंजीपुरा), तेथे काम करणारे रितेश गौतम भावे (३०, अंबाझरी, हिलटॉप), पीयूष गजानन काळपांडे (२१, हिलटॉप, अंबाझरी) व एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच तेथे ग्राहक म्हणून बसलेल्या अभिलाश गौतम भावे (३३, अंबाझरी हिलटॉप), अभिजित मोहन वासनिक (३०, समर्थनगरी), विपीन प्रल्हाद राऊत (३१, कामगारनगर), शंतनु गणेश जयस्वाल (३०, रामनगर), विश्वा पारस मेहता (३०, सदर), सलमान जावेद अजानी (५०, भद्रावती, चंद्रपूर), शंतनु प्रभाकर देठे (२९, म्हाळगीनगर), ऋत्विक जितेंद्र भावसार (३२, अहमदाबाद, गुजरात) यांच्यासह चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कारवाई झाल्यावर परत तेथे हुक्का विक्री सुरू झाली. दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजून ५० मिनिटांनी अंबाझरी पोलिस ठाण्याच्या पथकाने धाड टाकली. तेथे हुक्का पुरविल्या जात होता. पोलिसांनी कॅफे मालक अभिलाष गौतम भावे (३३, हिलटॉप, अंबाझरी), रोहित नरेशसिंग ठाकूर (२५, शांतीनगर मार्ग), रजा अनवीर शेख (२२, शांतीनगर) व फैजान रफीक शेख (२३, हंसापुरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिलाश भावे हा कॅफे मालक असल्याची बाब समोर आली. मात्र पहिल्या धाडीत याच अभिलाशला पोलिसांनी ग्राहक म्हणून दाखविले होते. 


इतकी हिंमत येते कुठून ?
कॅफेच्या आड हुक्का पार्लर चालविणे ही तर अनेक ठिकाणी नियमित बाब झाली आहे. त्यातही रात्री तीन ते चार वाजेपर्यंत अनेक ठिकाणी ग्राहकांना प्रतिबंधित हुक्का पुरविल्या जातो. कारवाई झाल्यावर काही वेळातच हुक्का विक्री करण्याची हिंमत या कॅफेचालकांकडे कुठून येते? असा सवाल उपस्थित होत आहे.


पुन्हा पेटतात धुराडं
नागपुरात हुक्का पार्लरवर धाड टाकल्याच्या बातम्या झळकतात; मात्र काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा धुराडं पेटलेलं दिसतं. हे दृश्य पाहून प्रश्न उपस्थित होतो की पोलिसांची कारवाई खरोखर परिणामकारक आहे का? गुन्हे दाखल करून फाईल जाड करण्यापलीकडे काही होत नाही का? कॅफेचालकांना इतकी हिंमत कुठून येते, की ते कायद्याला सरळसरळ चॅलेंज देतात ? यामागे पोलिसांची उदासीनता, हलगर्जीपणा की अन्य काही संगनमत आहे, अशी चर्चा ऐकायला येत आहे.

Web Title: Hookah smoke is once again coming out of the noses of Nagpur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.