नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित ! रेडफोर्ट बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:25 IST2025-11-12T18:25:01+5:302025-11-12T18:25:28+5:30
Nagpur : अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.

High alert declared at Nagpur airport! Security agencies across the country on high alert after Red Fort blast
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून गस्त, तपासणी आणि श्वान पथकांच्या हालचालींना अधिक गती देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी विशेष सूचना
अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, बॅगेज आणि ओळखपत्र तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सीआयएसएफ आणि श्वान पथके सतर्क
सुरक्षा दलांच्या क्विक रिअॅक्शन टीम्स सतत गस्त घालत असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. श्वान पथकांचे सतत चेकिंग सुरू आहे. विमानतळावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची काटेकोर तपासणी केली जात आहे.
सुरक्षेचे तीन स्तर अधिक कडक
- विमानतळ परिसरात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस दलाच्या संयुक्त पथकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. धावपट्टी आणि हँगर परिसरात गस्त वाढवली.
- हँडबॅग्स आणि लगेजची टर्मिनल एरियात प्रवाशांच्या तपासणी, तर बाह्य परिसरात पार्किंग आणि आगमन व निर्गमन रस्त्यांवर वाहन तपासणी तीव्र करण्यात आली आहे.
"दिल्लीत झालेल्या घटनेनंतर नागपूर विमानतळावर तत्काळ हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. सीआयएसएफ, श्वान पथक आणि सशस्त्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत"
- आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.