मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:22 IST2025-08-20T15:22:03+5:302025-08-20T15:22:44+5:30

विदर्भात निसर्गाचा रौद्र अवतार : गडचिरोलीत १८३ मिमी पावसाची नोंद, गोसेखुर्दचे ३३ गेट खुले

Heavy rains wreak havoc in Vidarbha! Three killed in floods, hundreds of villages cut off | मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

Heavy rains wreak havoc in Vidarbha! Three killed in floods, hundreds of villages cut off

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासून गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा पुराच्या पाण्यात बळी गेला. नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतही पातसाने धुमाकुळ घातला असून नदी-नाले दुथद्धी भरून वाहत आहेत. परिणामी, ५० हुन अधिक मार्ग बंद पडले. तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. लाखो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली असून शेकड़ों परांची पडझड झाली आहे.


गडचिरोली जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंत १२ तासांत येथे १८३ मि.मी. पाऊस झाला. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून शेवटच्या टोकावरील भामरागडला याचा सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने या शहरासह परिसरातील ७० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. यादरम्यान तालुक्यातील खंडी गावाजवळील नाला ओलांडताना एक युवक वाहून गेला. लालचंद कपिलसाय लाकडा (१९, रा. कोडपे) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. चंद्रपुरात जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील बिजोणी नाल्यावरून जाताना पत्रू गंगाराम ठावरे (४५, रा. बोरगाव धांडे) हा व्यक्ती तोल गेल्याने पुरात वाहून गेला. नाल्यापासून काही अंतरावर पत्रू ठावरे यांचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वैनगंगेचे पाणी वाढले असून नाल्यांना पूर येऊन मंगळवारी जिल्ह्यातील १८ मार्ग बंद झाले. इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडल्याने वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सावली व जिवती तालुक्यातील ४८ घरांची पडझड झाली. तेलंगणा सीमेलगतच्या राजुरा तालुक्यातील १९ गावांची शेती अद्यापही पाण्याखाली आहे.


वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील बोथली (किन्हाळा) येथील नाल्याला पूर आल्याने रवींद्र बाबाराव गोंधळी (४५) नामक व्यक्ती सोमवारी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेला. नाल्यावरून पुराचे पाणी असतानाही त्याने दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबतचे दोघे यातून कसेबसे बचावले. सोमवारी दुपारपासूनच्या धुवाधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहायला लागले.


मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंतचा पाऊस मि.मी.मध्ये
गडचिरोली - १८३.२
भंडारा - १६४.४
चंद्रपूर - १०७
ब्रह्मपुरी - १६४.४
नागपूर - ९१.७
भिवापूर - १०८
गोंदियाअर्जुनी मोरगाव - ८३
वर्धा - ४९.४


रात्री धो-धो, दिवसा शांत
नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यांत सोमवारी रात्री धो-धो पाऊस कोसळला. मंगळवारी दिवसा मात्र पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी पुन्हा श्रावणधारा बरसल्या. हवामान विभागाने येत्या १२ तासांत अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यातही विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.


गोसेखुर्दचे ३३ गेट उघडले
भंडारा जिल्हयात सोमवारच्या रात्री पचनी आणि लाखांटूर या दोन तालुक्यांतील ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पवनी तालुक्यात दोन मार्ग रात्रीतून बंद पडले. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गोसे खुर्द प्रकल्पाचे ३३ गेट अर्धा मीटरने उघडले निम्न वर्धा प्रकल्पाचे १९ दरवाजे २ ३० सेंटिमीटरने उघडण्यात आली व त्यातून १११.८८ घनमीसे पाण्याचा विसर्ग वणाँ नदीपात्रात सुरू आहे.

Web Title: Heavy rains wreak havoc in Vidarbha! Three killed in floods, hundreds of villages cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.