लग्नाला नकार दिला म्हणून त्याने फेसबुकवर पोस्ट करत केली तिची बदनामी; न्यायालयाने दिलेला निकाल महत्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:50 IST2025-12-06T18:49:06+5:302025-12-06T18:50:04+5:30
Nagpur : समाजमाध्यमांवर महिलेसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणे विनयभंगच होय, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

He defamed her by posting on Facebook because she refused to marry him; The court's verdict is important
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजमाध्यमांवर महिलेसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणे विनयभंगच होय, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
पुणे जिल्ह्यातील आरोपी तुकाराम बाळासाहेब रासकर (३०) याने एका विवाहित महिलेची बदनामी करण्यासाठी तिच्या फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. तसेच तो महिलेच्या हालचालीवरही लक्ष ठेवत होता. त्यामुळे महिलेने ६ फेब्रुवारी २०२० रोजी अकोला जिल्ह्यातील चन्नी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता आरोपीविरुद्ध विनयभंग व पाठलाग करणे या गुन्ह्यांचा एफआयआर दाखल करण्यात आला. आरोपीने तो एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या निर्णयाद्वारे ती याचिका फेटाळून लावली. तक्रारकर्त्या महिलेची लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, आरोपीने लग्नाची मागणी घातली असता महिलेने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपी चिडला होता.