हवाला स्कॅम; १० रुपयांत मिळणार होते हवालाचे ३ कोटी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 01:00 PM2022-03-07T13:00:30+5:302022-03-07T13:12:01+5:30

शुक्रवारी, ४ मार्चला रात्री पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी नेहाल सुरेश वडालियाच्या सदनिकेत छापा घालून, चार कोटी २० लाखांचे घबाड जप्त केले.

Hawala scam : nagpur police investigating through WhatsApp chats on accused phone to find the codeword | हवाला स्कॅम; १० रुपयांत मिळणार होते हवालाचे ३ कोटी ?

हवाला स्कॅम; १० रुपयांत मिळणार होते हवालाचे ३ कोटी ?

Next

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सव्वाचार कोटींच्या नोटांची चाैकशी करतानाच हवाला रॅकेटची बेरीज-वजाबाकी करण्यातही नागपूर पोलीस गुंतले आहेत. दरम्यान, पोलिसांना या नोटांसोबत काही सांकेतिक नोट्स (नोंदी)ही मिळाल्या आहेत. त्यातून १० रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची खेप एका पार्टीकडे पोहोचविण्याचे ठरले असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

शुक्रवारी, ४ मार्चला रात्री पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी नेहाल सुरेश वडालियाच्या सदनिकेत छापा घालून, चार कोटी २० लाखांचे घबाड जप्त केले. पोलिसांनी गोंदियातील हवाला व्यावसायिक शिवकुमार हरिश्चंद्र दिवानीवाल तसेच वर्धमान विलासभाई पच्चीकार हेसुद्धा वडालियाच्या सदनिकेत नोटा मोजताना आढळले होते. या तिघांचे मोबाईल ताब्यात घेण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या व्हाॅटस्ॲपमधून अनेक मेसेज डिलिट केले. मात्र, काही मेसेज अन् फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.

एकाने सांकेतिक भाषेत ३ किलो मिठाईची मागणी नोंदवली आहे. बदल्यात १० रुपयांची नोट पाठवली आहे. याचा नेमका अर्थ वडालिया, दिवानीवाल आणि पच्चीकार सांगायला तयार नाही. मात्र, खुलासेवार विचारपूस केल्यानंतर ही ३ किलो मिठाई म्हणजे, ३ कोटी रुपये असावेत आणि बदल्यात पाठविण्यात आलेली १० रुपयांची नोट ही ‘डिलिव्हरी-की’ (नोटांची खेप घेण्यासाठीचा पुरावा) असावी, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

दरम्यान, हवाला व्यावसायिकांनी डिलिट केलेली चॅटिंग मिळविण्याचे पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. अन्य कोडवर्डचा (सांकेतिक भाषेचा) अर्थ माहीत करून घेण्यासाठीही पोलीस प्रयत्न करीत आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त गजानन राजमाने हे दोघेही टेक्नोसॅव्ही अधिकारी म्हणून ओळखले जातात. हवालाची पाळेमुळे यावेळी खोदून काढली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘लोकमत’च्या वृत्तामुळे खळबळ

जप्त केलेल्या नोटांच्या काही बंडलांवर छपाईच्या कारखान्यासारखे दिसणारे पांढरे पॅकिंग लावलेले आहे. त्यातून हवाला चालविणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे किती वरपर्यंत गेली ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ‘लोकमत’ने या संबंधाचे वृत्त आज ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांचे इन्कम टॅक्सला पत्र

जप्त केलेल्या नोटांचे विवरण अन् कारवाईची सविस्तर माहिती शहर पोलिसांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एका पत्राद्वारे पाठविली आहे. आज, सोमवारी हवाला रॅकेटच्या संबंधाने अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

Web Title: Hawala scam : nagpur police investigating through WhatsApp chats on accused phone to find the codeword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.