‘सोशल मीडिया’वर पदवीधरचा प्रचार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:41+5:302020-12-02T04:08:41+5:30

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळीच थंडावल्या. मतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवारांच्या कार्यालयातदेखील प्रचाराच्या दृष्टीने शांतता ...

Graduate propaganda continues on social media | ‘सोशल मीडिया’वर पदवीधरचा प्रचार सुरूच

‘सोशल मीडिया’वर पदवीधरचा प्रचार सुरूच

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळीच थंडावल्या. मतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवारांच्या कार्यालयातदेखील प्रचाराच्या दृष्टीने शांतता दिसून येत होती. मात्र ‘सोशल मीडिया’वर प्रचार सुरूच असल्याचे चित्र होते. उमेदवारांसोबतच समर्थकांकडूनदेखील यासंदर्भात संदेश पाठविण्यात येत असून, ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या ‘अ‍ॅप’ची तपासणी शक्य नसल्याने प्रशासनाचा इशारा बिनकामाचा ठरला असल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्ष प्रचार बंद झाला असला तरी ‘सोशल मीडिया’वरील विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ फिरविण्यात येत आहेत. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’वर हे प्रमाण कमी असले तरी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर अनेकांकडून प्रचाराशी संबंधित ‘कन्टेंट’ टाकण्यात येत आहे. उमेदवारांच्या समर्थकांकडून ‘ई प्रचार’ जोरदार सुरू आहे. यात संबंधित पक्ष, उमेदवारास मत द्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेशाची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची तपासणी करणे शक्यच नाही. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशाची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही. त्याचाच फायदा उचलून प्रचाराची मुदत संपल्यानंतरदेखील ऑनलाईन प्रचार सुरूच होता.

-उमेदवारांनादेखील भान नाही

प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांनीदेखील कुठल्याही माध्यमातून प्रचार करू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र पदवीधर मतदारसंघातील अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाचे निर्देश धाब्यावर बसविले. खुद्द उमेदवारदेखील व्हॉट्सॲपवरून स्वतःलाच मत द्या, असे आवाहन करीत होते व मोठ्या प्रमाणात मतदारांशी संपर्क करीत होते.

Web Title: Graduate propaganda continues on social media