गाेंदिया, नागपूरकरांची हाडे गाेठली ! किमान तापमान ७ अंशावर; सीजनमधील निचांकी नाेंद
By निशांत वानखेडे | Updated: January 6, 2026 19:53 IST2026-01-06T19:49:04+5:302026-01-06T19:53:11+5:30
Nagpur : नववर्षाच्या सुरुवातीचे पाच दिवस दिलासा देणाऱ्या थंडीने मंगळवारी जाेरदार पुनरागमन केले. विदर्भातील काही जिल्ह्यात पारा माेठ्या फरकाने खाली पडला.

Gondia, Nagpur residents shiver! Minimum temperature at 7 degrees; lowest in the season
नागपूर : नववर्षाच्या सुरुवातीचे पाच दिवस दिलासा देणाऱ्या थंडीने मंगळवारी जाेरदार पुनरागमन केले. विदर्भातील काही जिल्ह्यात पारा माेठ्या फरकाने खाली पडला. किमान तापमान गाेंदियात ३.६ अंशाने, तर नागपूरला थेट ६ अंशाने खाली घसरले व अनुक्रमे ७ व ७.६ अंशाची दाेन्ही शहरात नाेंद झाली, जी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निचांकी नाेंद ठरली आहे. यापूर्वी १० डिसेंबरला नागपूरला सर्वात कमी ८ अंश तापमानाची नाेंद झाली हाेती.
जानेवारीच्या सुरुवातीच्या काही दिवस ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमान सरासरीच्यावर गेले हाेते. ४ जानेवारीला नागपूरचा पारा १५.२ अंशावर गेला हाेता. मात्र आकाशातून ढगांची गर्दी कमी हाेताच तापमानात घट झाली व साेमवारी पहाटे १३.६ अंश तापमान नाेंदविले गेले. मात्र आकाश पूर्णपणे निरभ्र झाले आणि तापमान झटकन खाली घसरले. साेमवारी रात्री थंडगार वाऱ्याने नागरिकांच्या अंगाला कापरे भरले हाेते. मध्यरात्री तर घराबाहेर थंडगार झालेले हातपाय गाेठल्यासारखी जाणीव नागरिकांना हाेत हाेती. मंगळवारी तापमानाची नाेंद पाहून आणखीच कापरे भरले. नागपूरचा पारा ६ अंशाने घसरून ७.६ अंशावर आला, जाे सरासरीपेक्षा तब्बल ५ अंशाने खाली आहे. दुसरीकडे साेमवारी १०.६ अंशावर असलेला गाेंदियाचा पारा ३.६ अंशाने घसरत ७ अंशावर आला.
सरासरीपेक्षा ५.३ अंशाने कमी तापमान असलेले गाेंदिया शहर राज्यात सर्वात थंड शहर ठरले आहे. याशिवाय वर्धा, अमरावती, ब्रम्हपुरी शहरांनाही जबरदस्त गारवा सहन करावा लागताे आहे. वर्धा ५ अंशाने घसरत ८.४ अंशाची नाेंद झाली. अमरावती ९.२, ब्रम्हपुरी ९.६ अंश व भंडाऱ्यात १० अंश तापमानाची नाेंद झाली.
थंडीची लाट तीन दिवस
जम्मू-काश्मिरसह उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. काश्मिर भागात किमान तापमान मायनसवर गेले आहे. हे निरीक्षण विचारात घेत हवामान विभागाने मध्य भारतातही तापमान २-३ अंशाने घसरण्याचा अंदाज वर्तवला हाेता. मात्र अंदाजापेक्षा अधिक फरकाने पारा घसरला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने विदर्भवासियांनाही कापरे भरले आहे. गारठ्याची ही स्थिती २४ तास अधिक तीव्रपणे जाणवेल, असा अंदाज आहे. ८ जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पारा वाढेल, अशी शक्यता वेधशाळेची आहे.