सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग ट्रेस
By नरेश डोंगरे | Updated: October 20, 2025 20:23 IST2025-10-20T20:22:10+5:302025-10-20T20:23:20+5:30
पश्चिम महाराष्ट्राचे कनेक्शन : मराठवाडा, आंध्रातही मारले अनेक हात

Golden Gang Traces That Blow Up Gold Worth Rs. 2.5 Crores
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सराफा व्यापाऱ्याचा पाठलाग करीत हावडा-मुंबई मेलमधून सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग ट्रेस करण्यात रेल्वेच्या तपास यंत्रणांना अखेर यश आले. दरम्यान, अशा प्रकारच्या अनेक धाडसी चोऱ्या, लुटमाऱ्या या टोळीने केल्या असून, मराठवाडा, आंध्र प्रदेशमधील तपास यंत्रणाही या टोळीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून पुढे आली आहे.
रविवारी रात्री हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमधून सराफा व्यापारी किशोर वर्मा (वय ४४, रा. गणपतीनगर, रा. जळगाव) प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ २.११ कोटी रुपये किमतीचे सोने होते. बडनेरा जवळ चोरट्यांनी हे सोने लंपास केले. वर्मा यांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर खडबडून जाग्या झालेल्या नागपूर जीआरपी क्राइम ब्रँचसह रेल्वेशी संबंधित सर्वच तपास यंत्रणा या धाडसी चोरीच्या तपासात गुंतल्या. विविध अँगल तपासल्यानंतर रेल्वेच्या तपास यंत्रणांना एक धागा मिळाला. त्याआधारे तपास केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेल्या या टोळीला ट्रेस करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
मराठवाडा आंध्रातही चोऱ्या
या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे मराठवाडा आणि लगतच्या आंध्र प्रदेशातही अनेक ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याची माहिती आहे. चोरी, लुटमारी केल्यानंतर पोलिसांचा तपास थंडा होत नाही तोपर्यंत टोळीतील सदस्य अंडरग्राऊंड होतात. अर्थात ते त्यांच्या गावात, नातेवाईकांकडे पोहचत नाहीत. सारे काही शांत झाले की गावात जायचे. नंतर दुसऱ्या गुन्ह्याची तयारी करायची, अशी या टोळीची कार्यपद्धती असल्याचे पुढे आले आहे.
गावाबाहेर दिवाळी
अत्यंत सराईत असलेली ही टोळी सव्वादोन कोटींच्या सोन्यावर हात मारल्यानंतर शहराबाहेर माैजमजा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात दिवाळीचे पर्व सुरू झाले असूनही कोणताही सदस्य अद्याप गावात पोहचलेला नाही. त्यामुळे टप्प्यात असले, तरी या टोळीचे सदस्य पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गावाबाहेर राहून ते 'फोनो फ्रेण्ड' करीत पोलिसांच्या हालचालीवर नजर ठेवून असावे, असा तर्क आहे.
अनेक ठिकाणी वॉन्टेड
या टोळीवर विदर्भासह, छत्रपती संभाजीनगर, आंध्र प्रदेश आणि दुसऱ्या काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. टोळी ठिकठिकाणच्या पोलिसांना वॉन्टेडही आहे. रेल्वे पोलिसांसह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील पोलिसांना यापूर्वी या टोळीने गुंगारा दिल्याची माहिती एका बड्या अधिकाऱ्याने 'लोकमत प्रतिनिधी'ला दिली आहे. लवकरच ही टोळी गजाआड होईल, असा विश्वासही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.