The golden age of film fame 'poster artist' has disappeared due to digital age! | चित्रपट प्रसिद्धीचा सुवर्णकाळ 'पोस्टर आर्टिस्ट' डिजिटल युगामुळे अदृश्य झाला!
विश्वनाथ यल्ला व सिद्धराम दासी या पोस्टर मेकर्सचा इतिहास सांगताना प्रा. मंगेश बावसे

ठळक मुद्दे‘फॉरगॉटन पोस्टर बॉईज ऑफ यस्टरइयर्स’मध्ये व्यक्त केली भावनातज्ज्ञांनी उलगडली ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ काळातील रेषांची रंगसंगती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दादासाहेब फाळके यांनी भारतीय नागरिकांना दिलेल्या चलचित्रपटांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम, मध्यंतरी बॅनर (बिलबोर्ड)- पोस्टर्सने केले. त्या काळातील नाविन्यता आणि मानसिकतेला आकर्षित करणाऱ्या या माध्यमाला मात्र, कायम उपेक्षेचे जीणे जगावे लागले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तशी वातावरणनिर्मिती करण्याचे काम पोस्टर्सने केले. मात्र, तंत्रज्ञानाचा विकास आणि डिजिटल युगातील प्रसिद्धीमुळे ‘पोस्टर आर्टिस्ट’चा तो काळ आज अदृश्य झाल्याचे दिसून येत असल्याची वेदना आज येथे व्यक्त करण्यात आली.
विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माणच्यावतीने मंगळवारी सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात ‘फॉरगॉटन पोस्टर बॉईज ऑफ यस्टरइयर्स’ या विषयावर प्रख्यात चित्रकार प्रा. चंद्रकांत चन्ने, चित्रपट विश्लेषक प्रा. ऋता धर्माधिकारी व नाटककार प्रा. मंगेश बावसे यांनी त्या काळाचा उलगडा आपल्या विश्लेषणातून केला. प्रकाश एदलाबादकर यांनी निवेदन केले.
बाबूराव पेंटरांमुळेच सेन्सॉर आणि करमणूक कर आले - प्रा. चंद्रकांत चन्ने
बाबूराव पेंटर हे मुळात चित्रकार, मूर्तिकार होते. मात्र, चित्रपट निर्मिती प्रक्रियेत पोस्टर्समध्येही लक्ष घातले. तो काळ ब्रिटिश सत्तेचा होता. त्यांच्या ‘सैरंध्री’ या चित्रपटात किचकवध रेखांकित करण्यात आला. किचक म्हणजे ब्रिटिश, सैरंध्री म्हणजे भारत माता आणि किचकाचा वध करणारा म्हणजे भारतीय, अशी सांकेतिक गोष्ट कळताच, ब्रिटिशांनी हा चित्रपट सेन्सॉर केला आणि मग प्रदर्शित केला. तसेच, आऊटडोअर चित्रिकरण होणारा ‘सिंहगड’ हा चित्रपट ठरला. सिंहगडावर चित्रिकरण होत असताना प्रचंद गर्दी उसळली. ती आवरण्यासाठी ब्रिटिशांनी करमणूक कर आकारण्यास सुरुवात केल्याचे प्रा. चंद्रकांत चन्ने म्हणाले.
चित्रपटांवर रंग उधळण्याचे काम पोस्टर मेकर्सने केले - मंगेश बावसे
विश्वनाथ यल्ला व सिद्धराम दासी यांची जोडी ‘यल्ला दासी’ म्हणून ओळखली जात होती. त्यांनी बिलिबोर्ड मेकिंगमध्ये प्रचंड ख्याती साधली. त्यांनी साकारलेल्या बॅनर्समुळेच चित्रपटांकडे रसिकांचा ओढा वाढत होता. त्यांचे पोस्टर्स बघूनच चित्रपटांचा दर्जा ठरत असे. मात्र, आज ज्यांना कुणीच ओळखत नाही. चित्रपट आणि रसिकांमधील मुख्य दुवा म्हणजे बॅनर्स असतात, हे त्यांनीच सिद्ध केले. अगदी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटांपासून ते रॉकी चित्रपटापर्यंत त्यांनी बॅनर्स साकारल्याचे प्रा. मंगेश बावसे म्हणाले.
पोस्टर्स, बॅनर्सचा तो खजिना संग्रहित नाही, हे दुर्दैव - प्रा. ऋता धर्माधिकारी
कलाविष्काराचा तो सुवर्णकाळ होता. हाताने दोन-दोन माळ्यापर्यंतचे बॅनर्स, बोर्ड हाताने रंगवणे आणि त्यात कलावंतांच्या संवेदना आणि चित्रपटाचा आशय सामावणे, हे सोपे काम नव्हते. आज तो काळ नाही आणि तंत्रज्ञानाच्या वापराने ती कला हद्दपार झाली. मात्र, त्या पोस्टर्स, बॅनर्स संग्रहित झाले नाही. संग्रहालय करण्याचे सुचले नाही, हे चित्रपट क्षेत्राचेच दुर्दैव आहे. गोपाळराव कांबळे यांनी साकारलेल्या पोस्टर्स, बॅनर्सची ख्याती सर्वदूर होती. व्ही. शांताराम यांनी प्रभात मधून त्यांना राजकमल स्टुडिओकडे सन्मानाने बोलावून घेतले. शांतारामांना हवे असलेले पोस्टर्स गोपाळरावांना अस्खलित जमत असल्याची माहिती प्रा. ऋता धर्माधिकारी यांनी दिली.

Web Title: The golden age of film fame 'poster artist' has disappeared due to digital age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.