सोने-चांदीचा भडका; चांदी २,६३,४०० रुपयांवर! सोने १,५००, तर चांदीत ९ हजारांची वाढ : नवीन खरेदीदार बाजारातून गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 00:01 IST2026-01-13T00:00:48+5:302026-01-13T00:01:51+5:30
सोने दीड लाखाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर चांदीने २.६३ लाखांची पातळी ओलांडल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

सोने-चांदीचा भडका; चांदी २,६३,४०० रुपयांवर! सोने १,५००, तर चांदीत ९ हजारांची वाढ : नवीन खरेदीदार बाजारातून गायब
नागपूर : जागतिक घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे सोमवारी सोने-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले. नागपुरात शनिवारच्या तुलनेत सोमवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३ टक्के जीएसटीसह १,५०० रुपयांची वाढ होऊन भाव १,४४,२०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजारांची वाढ होऊन भावपातळी विक्रमी २,६३,४०० रुपयांवर पोहोचली.
बाजारपेठ थंडावली, लग्नसराईची चिंता
सोने दीड लाखाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर चांदीने २.६३ लाखांची पातळी ओलांडल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. भाव गगनाला भिडल्याने नागरिक दागिने खरेदीऐवजी केवळ जुने सोने मोडून व्यवहार करण्यावर भर देत आहेत. नवीन खरेदीदार मात्र बाजारातून गायब झाले आहेत.
दररोज बदलणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अचानक होणाऱ्या या वाढीमुळे सणउत्सवांच्या काळातही अपेक्षित उलाढाल होताना दिसत नाही. चांदीच्या किमतीत ९ हजारांची एका दिवसातील वाढ ही ऐतिहासिक आहे, असे मत नागपूरच्या सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.