सोने-चांदीच्या दराचा ऐतिहासिक उच्चांक ! सहा दिवसांत किमती गगनाला ; का वाढताहेत इतके सोने-चांदीचे दर?
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 6, 2026 20:01 IST2026-01-06T19:59:49+5:302026-01-06T20:01:15+5:30
Nagpur : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले असून, नागपूरच्या बाजारपेठेत मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात १,७०० रुपये तर चांदीत तब्बल ८,४०० रुपयांची प्रचंड वाढ झाली.

Gold and silver prices hit historic high! Prices skyrocket in six days; Why are gold and silver prices increasing so much?
नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले असून, नागपूरच्या बाजारपेठेत मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात १,७०० रुपये तर चांदीत तब्बल ८,४०० रुपयांची प्रचंड वाढ झाली.
नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या सहा दिवसांतच गुंतवणूकदारांना दरवाढीचा मोठा धक्का बसला असून, या सहा दिवसांत सोने ४,००० रुपयांनी तर चांदी तब्बल १६ हजार रुपयांनी महागली. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांवर ३ टक्के जीएसटी अतिरिक्त आकारला जातो. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणारा फटका अधिकच वाढला आहे. जीएसटी आकारणीसह मंगळवारी २४ कॅरेट सोने १,४१,४०० रुपये आणि चांदीचे दर २,५२,२०० रुपयांवर पोहोचले.
नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव अंशुल हरडे म्हणाले, जागतिक परिस्थिती अशीच राहिली, तर सोन्याचे दर लवकरच दीड लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. चांदीच्या बाबतीतही हीच स्थिती असून, ती २.७५ लाख रुपये प्रति किलोपर्यंत मजल मारू शकते. गुंतवणूकदारांसाठी ही वेळ फायद्याची असली तरी, सामान्य ग्राहकांसाठी मात्र दागिने खरेदी करणे आता एक मोठे आव्हान ठरणार आहे.
का वाढताहेत सोने-चांदीचे दर?
या दरवाढीमागे जागतिक अस्थिरता आणि स्थानिक कारणे असल्याचे अंशुल हरडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेले भू-राजकीय तणाव आणि युद्धाची परिस्थिती यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या मूल्यात होणारे बदल आणि जागतिक बँकांनी सोन्याचा केलेला साठा यामुळे किमती वाढत आहेत. चांदीचा औद्योगिक वापर (इलेक्ट्रिक वाहने आणि सोलर पॅनेल) वाढल्याने आणि त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. त्यामुळे पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. भारतात लग्नसराईच्या हंगामामुळे स्थानिक मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
अशी झाली दरवाढ :
दिनांक सोने चांदी (रुपये)
- १ जाने. १,३३,३०० २,२८,८००
- ५ जाने. १,३५,६०० २,३६,५००
- ६ जाने. १,३७,३०० २,४४,९००
(३ टक्के जीएसटी वेगळा)