नागपुरात सोन्याने पुन्हा गाठली लाखाची पातळी, एकाच दिवसात २,१०० रुपयांची वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 6, 2025 20:30 IST2025-05-06T20:29:41+5:302025-05-06T20:30:10+5:30
Gold News: नागपुरात सोन्याच्या भावाने ३ टक्के जीएसटीसह पुन्हा लाख रुपयांची पातळी गाठली. याआधी २२ एप्रिलला सोने १,०१,९७० रुपयांवर होते. त्यानंतर भावात घसरण होऊ लागली.

नागपुरात सोन्याने पुन्हा गाठली लाखाची पातळी, एकाच दिवसात २,१०० रुपयांची वाढ
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - नागपुरात सोन्याच्या भावाने ३ टक्के जीएसटीसह पुन्हा लाख रुपयांची पातळी गाठली. याआधी २२ एप्रिलला सोने १,०१,९७० रुपयांवर होते. त्यानंतर भावात घसरण होऊ लागली. अखेर ६ मे रोजी दहा ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह १,००,४२५ रुपयांवर पोहोचले. भाव आवाक्याबाहेर गेल्याने सामान्य ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
२२ एप्रिलला सोने विक्रमी पातळीवर पोहोचले होते. २३ एप्रिलपासून भाव कमी होऊ लागले. ते आणखी कमी होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता, परंतु आता त्यांचे भाकित खोटे ठरल्याचे दिसत आहे. ३० एप्रिलला जीएसटीविना सोन्याचे दर ९५,४०० रुपयांपर्यंत कमी झाले. ३ मेपर्यंत भाव ९३,८०० रुपयांपर्यंत घसरले. ५ मे रोजी भाव ९५,४०० रुपयांवर स्थिरावले. अखेर ६ मे रोजी सोने २,१०० रुपयांनी वाढून ९७,५०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १,००,४२५ रुपयांवर पोहोचले.