शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना

By राजेश शेगोकार | Updated: September 29, 2025 13:22 IST2025-09-29T13:21:02+5:302025-09-29T13:22:17+5:30

Nagpur : आज विदर्भातील शेतकऱ्याचा चेहरा बघा. तो फक्त पावसाने भिजलेला नाही; तो निराशेने, संतापाने, भीतीने भरलेला आहे. एका बाजूला वाघाच्या दहशतीनं घराबाहेर पडणं अवघड झालंय, तर दुसऱ्या बाजूला पिकं उद्ध्वस्त होऊन उद्याचं पोट उपाशी राहणार आहे ही चिंता आहे.

Going to work in the fields, even letting children play in the yard is life-threatening.. The terror of tigers has not ended in 'this' district of East Vidarbha | शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना

Going to work in the fields, even letting children play in the yard is life-threatening.. The terror of tigers has not ended in 'this' district of East Vidarbha

नागपूर : भय इथले संपत नाही, असे म्हणण्यासारखी स्थिती सध्या पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांत आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा संपूर्ण पूर्व विदर्भ सध्या एका भीषण प्रश्नांशी झुंजतो आहे. सकाळी शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणे, जनावरांना चरण्यासाठी नेणे हा साधासोपा दैनंदिन व्यवहारही त्यांच्या जिवावर बेतू लागला आहे.

जंगलालगतच्या गावांत राहणारे गावकरी प्रत्येक दिवस वाघ व बिबट्याच्या दहशतीत घालवत आहेत. वाघ संवर्धनाच्या यशस्वी मोहिमेची आपण छातीठोकपणे दाद देतो, पण त्या यशामागे ग्रामीण भागातील सामान्य माणसांची किंमत किती मोठी आहे हे मात्र कुणी बोलत नाही.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बाबा आमटे प्रकल्पाच्या वसाहतीत अन्नपूर्णा बिलोणे ही पन्नाशीची महिला अंगणात भांडी घासत असताना वाघाने तिच्यावर झडप घातली. यातच तिचा बळी गेला. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील शुभम बबन मानकर या दुसऱ्या वर्गातील चिमुकल्याला वाघाने वडिलांच्या डोळ्यांसमोरून उचलून नेले. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथे अंश प्रकाश मंडल हा पाच वर्षाचा चिमुकला लघुशंका करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या अंशच्या नरडीचा घोट घेतला. अशा घटना रोजच्या झाल्या आहेत. अवघ्या ९ महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत ३१ बळी गेले आहेत. गोंदियात वाघाच्या हल्ल्यात या वर्षात दोन ठार, तर चार जखमी झाले आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यातही दोन बळी गेले आहेत. एकंदर वाघ व बिबट्याच्या दहशतीने येथील गावकरी बेहाल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पारशिवनी, रामटेक व सावनेर तालुक्यातील काही भागात वाघांच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी व गुराख्यांचा मृत्यू झाला आहे. उमरेड कहांडला अभयारण्यालगतच्या कुही व भिवापूर तालुक्यात वाघांचे शेतकऱ्यांवरील हल्ले वाढत आहेत.

हा सगळा प्रश्न फक्त वनविभागाच्या कामकाजाचा नाही, तर विकासाच्या एकूण धोरणाचा आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, खाणकाम, जंगलातील सततची मानवी घुसखोरी यामुळे वाघांचा अधिवास विस्कळीत झाला आहे. वाघांना अन्नासाठी मानवी वस्तीच्या जवळ यावं लागल्याने हा जीवघेणा संघर्ष सुरू झाला आहे. वाघाच्या वाढत्या संख्येला आपण संवर्धनाचं यश मानतो; पण त्या संख्येला जगण्यासाठी पुरेसा सुरक्षित अधिवास दिलाच नाही, ही खरी शोकांतिका आहे.

वाघाचं रक्षण करण्यासाठी मोहिमा चालतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होतं. पण माणसाचा जीव गेला, तर त्याचं काय? जंगल वाचलं पाहिजे, वाघ वाचला पाहिजे हे खरं; पण शेतकरी जर जिवंत राहिला नाही, तर या सगळ्या संवर्धनाला अर्थ काय? 'वाघाचं भविष्य उज्ज्वल, पण माणूस वाचेल का?' हा प्रश्न विदर्भातील प्रत्येक गावकऱ्यांच्या डोक्यात भुंगा घालत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचे नैतिक कर्तव्य आहे.

वाघांचे रक्षण महत्त्वाचेच, पण त्याहून मोठं काम म्हणजे शेतकऱ्याचा हात धरून त्याला जगण्यासाठी आधार देणं. कारण वाघांशिवाय जंगल नाही, पण शेतकऱ्यांशिवाय जीवनच नाही.
 

Web Title : पूर्वी विदर्भ में बाघ का आतंक: ग्रामीण भयभीत जीवन जीने को मजबूर

Web Summary : पूर्वी विदर्भ के ग्रामीण बाघों के हमलों से त्रस्त हैं। आवास नुकसान के कारण बाघ-मानव संघर्ष बढ़ रहा है, जिससे दैनिक जीवन खतरे में है। संरक्षण प्रयासों में बाघों को प्राथमिकता दी जाती है, लेकिन मानव जीवन जोखिम में है। किसानों के लिए समर्थन महत्वपूर्ण है।

Web Title : Tiger Terror Grips East Vidarbha: Villagers Live in Constant Fear

Web Summary : East Vidarbha villagers face deadly tiger attacks. Daily life is threatened as tiger-human conflict escalates due to habitat loss. Conservation efforts prioritize tigers, but human lives are at risk. Support for farmers is crucial.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.