'अर्ज घ्या, मतदारयादीसाठी उद्या या' विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची नियोजनशून्य तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:40 IST2026-01-08T15:39:07+5:302026-01-08T15:40:00+5:30
Nagpur : विदर्भातील मुख्य साहित्य संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने अध्यक्ष व कार्यकारी मंडळाची निवडणूक जाहीर केली आहे. बुधवारी ७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

'Get the application, come tomorrow for the voter list' Unplanned preparations for the Vidarbha Sahitya Sangh elections
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :विदर्भातील मुख्य साहित्य संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने अध्यक्ष व कार्यकारी मंडळाची निवडणूक जाहीर केली आहे. बुधवारी ७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी इच्छुकांना वि. सा. संघाच्या नियोजनशून्यतेचा फटका बसला. उमेदवारी अर्जासोबत मतदारयादी मिळणे अपेक्षित असताना, ती तयार नसल्याचे सांगण्यात आल्याने विशेषतः इतर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांना अर्ज न करता परतावे लागल्याचे समोर आले आहे.
विदर्भ साहित्य संघाने कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया ७जानेवारीपासून सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज २२ जानेवारीपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्ष केंद्रीय कार्यालयात येऊन भरायचा आहे. निवडणुकीचा कार्यक्रम १४ मार्चपर्यंत चालणार असून, १५ मार्चला मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी नागपूर मध्यवर्ती संस्थेत येऊ लागले आहेत. दुपारी ४ ते ६ वाजता या कालावधीत अर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी काही उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी आले होते. त्यात अकोला, यवतमाळच्या इच्छुकांचाही समावेश होता. नामनिर्देशनपत्राचे शुल्क ५०० रुपये आहे.
इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र घेतले व मतदारयादीची मागणी केली. मात्र, निर्वाचन अधिकारी मोहन पारखी यांनी 'आज मतदारयादी तयार नाही, उद्यापर्यंत छापून येऊ शकता' असे उत्तर दिले. त्यामुळे इच्छुकांना नामनिर्देशनपत्र भरताना अडचण होत असल्याने त्यांना तो न भरताच परतावे लागले. आता त्यांना पुन्हा मतदारयादी घेणे व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हेलपाट्या घालाव्या लागणार असल्याने मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वि. सा. संघाने तयारी नसताना निवडणूक कार्यक्रमाची घोषणा का केली, असा असंतोष व्यक्त करण्यात आला. केंद्रीय संस्थेने दाखविण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला का, असा सवालही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना उपस्थित केला आहे.
६७ संस्था, ९ हजार मतदार
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाच्या २२ सभासदांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ पर्यंत नवीन कार्यकारिणीचा कार्यकाळ असेल. यासाठी विदर्भाच्या ११ जिल्ह्यांतील ६७संस्था आणि ९३०० आजीव सभासद मतदान करतील. त्यातील पाचेक हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सभासदासाठी ५ हजार, अध्यक्षासाठी १० हजार
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अनामत रक्कम भरायची आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारास १० हजार रुपये, तर सभासदपदासाठी इच्छुक उमेदवारास ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावयाची आहे. काहींनी यावरही आक्षेप घेतला आहे.